ताज्याघडामोडी

नमामी चंद्रभागा विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक – आ. समाधान आवताडे 

भारताची दक्षिण काशी म्हणून लौकिक असणाऱ्या पंढरपूर शहरामध्ये वारीनिमित्त लाखो वारकरी भाविक पंढरीत दाखल होतात. सांप्रदायिक आणि अध्यात्मिक राजधानी असणाऱ्या पंढरपूर मध्ये येणारा वैष्णवांचा मेळा चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी जमा होतात.पंढरपूर नगरीच्या जलतीर्थ आख्यायिकेची परंपरा जतन करणारी चंद्रभागा नदी गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषण आणि घाणीचे साम्राज्य यांच्या कचाट्यात सापडली असल्याचे दिसून येत आहे.

वारकरी भक्तांच्या विठ्ठल आराधनेची साक्ष देणाऱ्या चंद्रभागा नदीचा ननामी गंगा नदीच्या धर्तीवर कायापालट करावा अशी मागणी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आ. समाधान आवताडे यांनी केंद्रीय मंत्री यांच्या नवी दिल्ली येथे भेटी घेतल्या. दिल्ली दौऱ्यामध्ये आ. समाधान आवताडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे – पाटील यांच्या भेटी घेतल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना समस्त पंढरपूर वासियांच्या वतीने पंढरपूर भेटीचे निमंत्रण आ. समाधान आवताडे यांनी दिले. चंद्रभागा नदीचे पावित्र्य जपण्यासाठी व होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी ननामी चंद्रभागा प्राधिकरण स्थापना केली होती.

सदर प्राधिकरण अंतर्गत नदीला जोडणाऱ्या प्रदूषण मार्गाला प्रतिबंध करणे, उपलब्ध पाणी स्रोत यांचे शुद्धीकरण करणे, नदी पात्राच्या दोन्ही किनाऱ्यावर वृक्ष लागवड करणे, नदी किनाऱ्यांचे सौंदर्ययीकरण करणे, पंढरपूर वारीनिमित्त येणाऱ्या वारकरी भक्तांच्या आरोग्य सेवेसाठी आवश्यक सोयी – सुविधा उपलब्ध करणे, शौचालय निर्मिती करणे आदी सुविधा या बाबींचा विकास करणे हे या प्राधिकरणाचे मुख्य उद्दिष्ट होते.

परंतु या प्राधिकरणाची स्थापना झाल्यापासून यामध्ये कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदर प्राधिकरण स्थापना अनुषंगाने याबाबत अजून एकही बैठक झालेली नाही. ननामी चंद्रभागा या योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. चंद्रभागा नदीचा ननामी गंगा नदीच्या धर्तीवर विकास झाल्यास वरील समस्या कमी होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रतिनिधित्व करत असलेल्या लोकसभा मतदारसंघातील वाराणसी शहराचा झालेला तेजोमय कायापालट खूप आदर्शवत आणि नेत्रदीपक आहे. अगदी त्याच धर्तीवर परमात्मा विठ्ठल – रुक्मिणी नगरी असणाऱ्या पंढरपूर शहराचा विकास येथील सांप्रदायिक परंपरेला अधोरेखित करेल असेही आ. समाधान आवताडे यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे. आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये अनन्यसाधारण महत्व असलेल्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पंढरपूर शहराचाही या योजनेमध्ये समावेश करावा असेही आ. आवताडे यांनी मागणी केली आहे.

आ. समाधान आवताडे यांच्या सर्व मागण्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर तपशील घेऊन पंढरपूर दौऱ्यादरम्यान आपण स्वतः सर्व गोष्टींचा अभ्यास करून ननामी चंद्रभागा संदर्भात विश्वसनीय पाऊल उचलण्याचा शब्द आ. समाधान आवताडे यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *