गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एक कोटी विम्यासाठी पत्नीने दहा लाखांची सुपारी देऊन नवऱ्याचा काढला काटा

एक कोटीच्या विम्याच्या रकमेसाठी चक्क पत्नीनेच दहा लाख रुपयांची सुपारी देऊन पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मयतच्या पत्नीसह इतर चौघांनी मिळून हा प्रकार केल्याची माहिती रविवारी (दि. 12) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

ग्रामीण हद्दीतील पिपरगव्हाण शिवारातील म्हसोबा फाटा परिसरात शनिवारी (ता. 11) एक अज्ञात इसमाचे प्रेत मिळून आले होती. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या ठिकाणी पोलिसांना विनानंबरची स्कुटी मिळाली होती. यानंतर मयताची ओळख पटल्यानंतर पोलिसांना मयताचे नांव मंचक गोविंद पवार (रा. बीड) असल्याचे समजले. या प्रकरणी त्याची पत्नी व मुलगा यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यांचे वागणे बोलणे हे संशयास्पद आढळून आले. यामुळे पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी श्रीकृष्णा सखाराम बागलाने (वय 27 वर्षे रा. काकडहिरा ता. जि. बीड) संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, गुन्ह्याचे स्वरूप कळाले.

आरोपीने सांगितले की, सदरचा गुन्हा मी व माझ्यासोबत इतर 3 जणांनी मिळून केला आहे. हे करण्यासाठी मयताची पत्नी गंगाबाई मंचक पवार यांनी आम्हाला दहा लाखांची सुपारी दिली होती. शुक्रवारी (ता. 10) मी व इतर तीन जणांनी मिळून म्हसोबा फाटा परिसरात मंचक गोविंद पवार यास मारले. यानंतर अपघाताचा बनाव करण्यासाठी, त्यास रोडवर आणून त्याच्याजवळील स्कूटी गाडीस आयशर टेम्पोने जोराची धडक दिली.

सदर जबाबावरून पोलिसांनी श्रीकृष्ण सखाराम बागलाने (वय 27 वर्षे रा. काकडहिरा ता. जि. बीड), सोमेश्‍वर वैजिनाथ गव्हाणे (वय 47 वर्षे रा. पारगाव सिरस), गंगाबाई भ्र. मंचक पवार (वय 37 वर्षे रा. वाला ता. रेणापूर, जि. लातूर ह. मु. मिरगे रो हाऊस, अंकुशनगर बीड)यांना ताब्यात घेतले आहे. यातील दोन जण फरार असून पोलीस त्यांचा तपास घेत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे, कैलास ठोंबरे, नशीर शेख, अभिमन्यू, सतीश कातखडे, अशोक दुबाले, गणेश हंगे, राहुल शिंदे, अश्‍विन सुरवसे, गणेश मराडे, संपत तांदळे, अतुल हराळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *