ताज्याघडामोडी

फिर्यादी म्हणाला काही तरी डिस्काउंट द्या,टोणपे म्हणाला आता १५ द्या,साहेबांचे १० परत द्या !

व्हाईस रेकॉर्डर मुळे पुढे आली पंढरपूर बांधकाम विभागातील ‘त्या’ लाचखोरीच्या सुरस कथा

पंढरपूर बांधकाम उपविभागात सुरु असलेल्या कारभाराची अब्रू कालच्या लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईमुळे वेशीवर टांगली गेली असून या कारवाईत चंद्रकांत टोणपे या भंडारपाला विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबत शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादी नुसार गायगव्हाण तालुका सांगोला येथील शेतकऱ्याची गट नंबर ४१ मध्ये शेतजमीन आहे.सदर जमीन बिगरशेती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणात पत्र आवश्यक असल्याने फिर्यादीने १३ जून रोजी चंद्रकांत टोणपे याची कार्यालयात जाऊन भेट घेतली.त्यावेळी टोणपे याने ३० हजार रुपयांची मागणी केली.व वरिष्ठाना पैसे दयावे लागतात त्या शिवाय सही होत नाही असे सांगितले.यावेळी फिर्यादीने तात्पुरत्या स्वरूपात टोणपे यास ५ हजार रुपये दिले.   

मात्र ना हरकत प्रमाण पत्रासाठी लाचेची मागणी केली जात असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने थेट सोलापूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क  साधला.व रीतसर तक्रार नोंदवली.पोलीस निरीक्षक कोळी यांनी तातडीने दखल घेत कारवाईची तयारी सुरु केली.पंचासमक्ष फिर्यादीचा जबाब नोंदवून घेतला.फिर्यादीस आधुनिक व्हाईस रेकॉर्डर देण्यात आला व शर्टाच्या आतील बाजूस लपवून तो सुरु करण्यात आला.फिर्यादीने आरोपी टोणपे यास फोन करून भेटण्यास येत असल्याचे सांगितले असता कराड नाका येथे काम सुरु असल्याचे सांगत आरोपीने तेथे येण्यास सांगितले.फिर्यादी हे तेथे गेले असता टोणपे याने भेटल्याशिवाय काम होत नसते असे सांगितले.त्यावेळी आरोपीने काही तरी डिस्काउंट द्या अशी विनंती केली.त्यावेळी टोणपे याने मी दुसऱ्याकडून २० हजार घेतो तुम्ही २५ द्या असे सांगत आता १५ हजार द्या,साहेबाचे १० हजार नंतर द्या असे सांगितले.यावेळी फिर्यादीने एटीएम मधून काढून आणून देतो असे सांगितले व नियोजित ठिकाणी परत आले.त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक कोळी यांनी व्हाईस रेकॉर्डर मधील संभाषण ऐकले.१५ हजार रुपयांच्या नोटवरील क्रमांक लिहून घेण्यात आले.फिर्यादीने पुन्हा भंडारपाल टोणपेची भेट घेतली आणि टोणपेने १५ हजार लाचेची रक्कम स्वीकारत पॅन्टच्या डाव्या खिशात ठेवले.   

 आणि तेथे उपस्थित असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली.आता या प्रकरणी टोणपे हा वरच्या साहेबाला खरंच पैसे देत होता का ? हे पुढील तपासात स्पष्ट होणार आहे.                 

                                 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *