गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दंड भरण्यास सांगितल्याने तरुणाने डिझेल ओतून घेतले

ट्रिपल सीट जाताना सापडल्यामुळे वाहतूक पोलिसांनी तब्बल साडेसात हजार रुपयांचा दंड भरायला सांगितल्याने सैरभैर झालेल्या व वस्तुस्थिती सांगितल्यानंतरही गाडी सोडली जात नसल्याने वैतागलेल्या तरुणाने भरदुपारी भररस्त्यात अंगावर डिझेल ओतून घेतल्याची धक्कादायक घटना सातारा बसस्थानकानजीक घडली.

सातारा बसस्थानक ते पोवई नाका या रस्त्यावरून तिघेजण एका दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी बसस्थानकाशेजारी सेव्हन स्टार कॉम्प्लेक्ससमोर कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे कर्मचारी सोमनाथ शिंदे यांनी ती दुचाकी अडवली. त्यावेळी चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता, गाडीला नंबरप्लेट नव्हती तसेच कर्कश्य हॉर्न होता. ट्रिपल सीटसह या सर्व कारणांसाठीचा मिळून साडेसात हजार रुपयांचा दंड शिंदे यांनी दुचाकीस्वारास भरण्यात सांगितला.

तेव्हा कोरोनामुळे नोकरी गेली आहे, सध्या काम नसल्याने आम्ही काम शोधत आहोत, एवढा दंड भरायचा तरी कोठून असे तो तरुण काकुळतीला येऊन सांगत होता; पण वाहतूक पोलीस त्याचे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. इतके सांगूनही सहकार्य होईना आणि गाडीही देईना यामुळे संबंधित युवक पुरता वैतागून गेला होता. शेवटी त्याने कुठून तरी डिझेल मिळवले आणि भरदुपारी भररस्त्यात स्वतःच्या अंगावर ओतून घेतले.

काही समजण्याच्या आत हे थरारनाटय़ घडल्याने बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी झाली. काही वेळाने पोलीस गाडी तेथे आली आणि त्या युवकाला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्याकडे निघून गेली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *