अभ्यासाचा कंटाळा आल्याने शाळेत न जाता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:च्याच अपहरणाचे नाट्य रचल्याचा प्रकार सोमवारी बल्लारपुरात उघडकीस आला.
शिकवणीसाठी गेला असता आपल्या मुलाचे कुणीतरी अज्ञाताने अपहरण केले होते, अशी तक्रार पंडित दीनदयाळ वॉर्डातील एका कुटुंबाने सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यात केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसही चक्रावले. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे स्वत: आपल्याकडे घेतली.
मुलाने बयानात सांगितलेल्या माहितीनुसार, कारवा जंगलाकडे आणि जुनोनापर्यंत जाऊन अनेकांची चौकशी केली. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही बघितले. परंतु अपहरणाबाबत काहीही ठावठिकाणा लागला नाही. शेवटी ठाणेदार पाटील यांनी त्या मुलाला विश्वासात घेऊन प्रेमाने विचारणा केली असता तेव्हा तो बोलू लागला.
मुलगा म्हणाला, मला अभ्यासाचा कंटाळा आला. त्यामुळे कारवा जंगलात निघून गेलो. मात्र, तेथून मला काही लोकांनी तिथे हटकले आणि जुनोनापर्यंत पोहोचवले. त्यानंतर माझा विचार बदलला आणि मी घरी आलो. आई-बाबांचा मार चुकविण्यासाठी खोटी माहिती दिली. मला अभ्यासाचे खूप टेंशन आल्यामुळे असे केल्याची त्याने कबुली दिली. तेव्हा ते कुटुंब आणि पोलिसांनीही सुटकेचा श्वास टाकला.
तक्रार अत्यंत गंभीर होती. त्यामुळे आम्ही लगेच तपासाला सुरुवात केली. परंतु, तपासात काहीच तथ्य आढळले नाही. अखेर मुलाने खरा प्रकार सांगितला. अशा घटना घडू नयेत, यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार करावेत.