ताज्याघडामोडी

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात हा धमकीचा फोन आलेला आहे. पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा धमकीचा फोन आज दुपारच्या सुमारास महिला आयोगाच्या कार्यालयात आलेला होता. अहमदनगरमधील व्यक्तीने फोन केल्याची माहिती मिळत आहे.

रुपाली चाकणकर यांना अशा धमकीचा फोन पहिल्यांदाच आलेला नाही. याअगोदरही दोन वेळा रुपाली चाकणकर यांना धमकीचे फोन आलेले होते. तुमचा कार्यक्रम करु, अशा प्रकारची भाषा त्या धमकीच्या फोनमध्ये वापरण्यात आली होती.

रुपाली चाकणकर कोण आहेत?

रुपाली चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. जुलै २०१९ मध्ये रुपाली चाकणकर यांच्यावर राष्ट्रवादीने महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मार्च २०२२ मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची अडीज वर्ष जबाबदारी सांभाळली. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी सूत्रे हातात घेत अतिशय ताकदीने काम केलं. याचंच बक्षीस म्हणून त्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं.

याअगोदरही धमकीचे फोन

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे रुपाली चाकणकर यांचे कार्यालय आहे. २६ डिसेंबर २०२० रोजी एका व्यक्तीने फोन करत चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती. यावेळी रुपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *