बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि तांबे घराण्याला काँग्रेस पक्षाच्या बाहेर काढण्यासाठी प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनी षडयंत्र रचून मला नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळून दिली नाही, असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला.
या सगळ्या कारस्थानाची स्क्रिप्ट अगोदरच लिहण्यात आली होती. पदवीधर निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म हवा होता, म्हणून मी नागपूरला नाना पटोले यांच्याकडे एक माणूस पाठवला होता. मात्र, नाना पटोले यांनी या माणसाला १० तास बसवून ठेवले आणि त्यानंतर त्याच्याकडे चुकीचे एबी फॉर्म दिले. यानंतर प्रदेश कार्यालयाकडून फक्त सुधीर तांबे यांच्या नावाचा एबी फॉर्म पाठवण्यात आला. मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माझ्या कुटुंबियांविरोधात भाजपशी संधान बांधल्याचे खोटे आरोप करण्यात आले, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले. ते शनिवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीबाबत काँग्रेसमधील प्रदेश कार्यालयातील नेत्यांनी हेतुपरस्सर गोंधळ घालून मला कशाप्रकारे उमेदवारी मिळवून दिली नाही, याबाबत सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तरपणे आपली बाजू मांडली. मला स्वत:च्या कर्तृत्वावर काहीतरी करून दाखवायचे होते. त्यासाठी मी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे मला संधी देण्याविषयी बोललो होतो. तेव्हा त्यांच्याकडून मला तू वडिलांच्या जागेवरुन उभा राहा, असा सल्ला देण्यात आला. हा सल्ला ऐकून मला संताप आला होता.
मात्र, नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जवळ आल्यानंतर माझे वडील सुधीर तांबे यांनीच मला निवडणुकीला उभे राहण्याचा आग्रह धरला. मी त्यासाठी राजी नव्हतो. अखेर बाळासाहेब थोरात आणि तांबे कुटुंबीयांशी चर्चा करुन मी निवडणुकीला उभा राहणार, असे ठरले. परंतु, मी त्याबाबत साशंक असल्याने नाशिक पदवीधर मतदारसंघात कोण उभे राहणार, याचा निर्णय आम्ही शेवटच्या क्षणी घेऊ, असे आम्ही एच. के. पाटील यांनी कळवले होते. पण त्यानंतर एखाद्या स्क्रिप्टनुसार घडामोडी घडत गेल्या आणि मला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यापासून दूर ठेवण्यात आले, असा आरोप सत्यजी तांबे यांनी केला.