ताज्याघडामोडी

विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करणारा ताब्यात, पोलीस चौकशी सुरू

3 ऑगस्टला विनायक मेटे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पुण्याच्या दिशेने येत असताना एक गाडी पाठलाग करत होती, असं हा कार्यकता या क्लिपमध्ये म्हणत आहे, त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. रांजणाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवंत मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणाव पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे.

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष विनायक मेटे यांचं 14 ऑगस्टला पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर अपघाती निधन झालं. मेटेंच्या या निधनावर त्यांची पत्नी, नातेवाईक तसंच कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने विनायक मेटेंच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला होता. या कार्यकर्त्याची स्थानिक पत्रकाराशी संवाद साधतानाची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे.

विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या गाडीचा मालक कम चालकाचं नाव संदीप विर आहे, त्यालाही ताब्यात घेऊन पोलीस त्याची चौकशी करत आहेत. 3 तारखेला या गाडीच्या चालकासोबत 6 जण होते. 6 जणांपैकी एकाचा वाढदिवस असल्यामुळे ते शिरूरला गेले होते, तसंच शिरूरमध्ये त्यांचे नातेवाईक असल्याकारणामुळे ते तिकडे गेले होते, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

अपघात घडला त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते, असा दावा मेटे यांच्या भाच्याने केला आहे. तसंच, चालक एकनाथ कदम याच्यावरही संशय व्यक्त केला आहे. ड्रायव्हर वारंवार विधानं बदलत आहे, असा दावाही मेटेंचे भाचे विनायक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *