ताज्याघडामोडी

भावाने मोबाईलमधून सिमकार्ड काढल्याच्या वादातून बहिणीची आत्महत्या

लहान बहिण घरातील काम सोडून सतत मोबाईल बघत असल्याने मोठ्या भावाने बहिणीच्या मोबाईलमधून सीमकार्ड काढल्याच्या वादातून बहिणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. ही घटना डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरात घडली. किरण शिवदास साहनी (१८) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

 मृत किरण कुटुंबासह शेलार नाका परिसरातील त्रिमूर्ती झोपडपट्टीत राहत होती. ती सतत मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे मोठ्या भावाला दिसत होते. त्यामुळे घरातील कामेही पडून राहत असल्याच्या संशयाने तो सतत तिला मोबाईलवर जास्त वेळ देऊन नकोस घरातील कामाकडेही लक्ष दे असे सांगत होता. मात्र मृत किरण त्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याचे भावाला समजले त्यामुळे गुरुवारी मृत किरण पुन्हा मोबाईलवर खेळत असल्याचे पाहताच मोठ्या भावाने तिच्या हातामधील मोबाईल काढून घेत त्यामधील सीमकार्ड काढून टाकल्याने याचा मृत किरणला खूप राग आला. ती त्याला काही बोलली नाही. तर वाद नको म्हणून भाऊ शेजारी निघून गेला. त्यानंतर काही वेळाने तो घरी आला असता त्याला घराचा दरवाजा बंद दिसला. त्याने आवाज देऊन दार उघडण्यास सांगितले. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता बहिणीने ओढणीच्या साहाय्याने छताच्या लोखंडी खांबाला गळफास घेतल्याचे त्याला दिसून आले. त्याने तात्कळ शेजाऱ्यांना माहिती देऊन दरवाजा तोडून शेजाऱ्यासह आत गेले. त्यावेळी शेजाऱ्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *