ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती? पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत कोरोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत सर्व राज्यांनी आपल्या राज्यात कोरोनाची काय स्थिती आहे, दैनंदिन रुग्णांची स्थिती या सर्वांची माहिती दिली. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आज आपण दररोज 25 हजारापर्यंत कोविड टेस्ट करत आहोत. हे टेस्टिंग आणखी वाढवण्यात येईल. महाराष्ट्र सेफ झोनमध्ये आहे, चिंता करण्याचं कुठलंही कारण नाहीये. राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या 929 इतकी आहे. राज्याने एका-एका दिवशी 65 हजार रुग्णसंख्या पाहिली आहे. एकंदरीत आकडेवारी पाहिली तर इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. दर 10 लाख नागरिकांमागे किती रुग्ण आहेत तर राज्यात 7 रुग्ण आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.

आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, आपल्या देशात सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच आहे. नवे व्हेरिएंट सुद्धा ओमायक्रॉनचाच भाग आहे. नवा व्हेरिएंट निर्माण झाल्याचा भाग नाहीये. राज्यात आता टेस्टिंग आणखी वाढवण्यात येणार आहेत. लसीकरणावरही भर देण्यात येणार आहे. ज्या वयोगटाचं लसीकरण कमी झालं आहे त्या वयोगटाचं लसीकरण लवकरात लवकर वेगाने करण्यात येईल. 6 ते 12 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची परवानगी मिळाली आहे त्यामुळे आता ही एक मोठी जबाबदारी आहे.

लहान मुलांचं लसीकरण करण्यासाठी आवश्यक नियमावली अद्याप प्राप्त झालेली नाहीये पण जशी मिळेल तशी त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. 12 ते 15 वयोगट आणि 15 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी पालक, शाळेतील शिक्षकांना विश्वासात घेऊन लसीकरणाचा दर वाढवण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *