ताज्याघडामोडी

राज्यमंत्री बच्चू कडू अडचणीत, 1 कोटी 95 लाखांच्या अपहाराचा आरोप, गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडूंविरोधात तपास करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले आहेत.

कलम 156/3 अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकरांनी यासंदर्भात बच्चू कडूंविरोधात ही तक्रार दाखल केली होती. अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अनियमिततेचा हा आरोप होता. पालकमंत्र्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी देत आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप वंचितनं केला होता. वंचितनं यासंदर्भात राज्यपालांकडेही कारवाईसाठी परवानगी मागितली होती. न्यायालयानं या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

वंचित बहुजन आघाडीनं अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. याची ठिणगी तीन रस्त्यांच्या कथित कामांवरून पडली. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामं पालकमंत्री कडूंनी डावलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितनं केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते.

या तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी १ कोटी ९५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचं वंचितनं म्हटलं होतं. यात रस्त्यांचे ‘ग्रामा (ग्रामीण मार्ग) क्रमांक’ नसतांना कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते, असा सवाल वंचितनं केला होता. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना दिली स्थगिती दिली होती.

‘या’ रस्त्यांच्या कामात अपहार झाल्याचा वंचितचा आरोप

-गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणारा लहान पुल आणि पोचमार्गाच्या कामात 50 लाखांच्या अपहाराचा आरोप.

-इजिमाला जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोड रस्ता सुधारणेच्या कामात 20 लाखांच्या अपहाराचा आरोप.

-कुटासा ते पिंपळोद मार्गाला जिल्हा मार्ग मार्ग दाखवत यासाठी निधी वळता करीत 1 कोटी 25 लाखांच्या अपहाराचा आरोप.

-पोलिसांनी तक्रार न घेतल्याने वंचितची न्यायालय आणि राज्यपालांकडे धाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *