चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. नांदेड जिल्ह्यात हा प्रकार समोर आला आहे. 60 वर्षांच्या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोह्याजवळ काल ही घटना घडली. नरबा कांबळे असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी या नराधमास चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
चॉकलेटचे आमिष दाखवून पाच वर्षांच्या बालिकेवर शारीरिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे.
नेमकं काय घडलं?
चिमुकलीचे आई-वडील शेताकडे गेल्याची संधी साधत गावातीलच नरबा कांबळेने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेले आणि अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीने आईला याबाबत सांगितले, त्यावेळी त्यांना धक्काच बसला.
गावकऱ्यांकडून चोप
यातील साठ वर्षीय नराधम आरोपी नरबा कांबळेला पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचार झाल्यानंतर मुलीला रक्तस्त्राव सुरू झाल्याने ही घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस आल्याने गावकऱ्यांनी आरोपीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केलं.
पीडितेवर रुग्णालयात उपचार
पीडित बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून सोनखेड पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.