ताज्याघडामोडी

प्रकाश आंबेडकरांनी केली विश्वास नांगरे पाटलांना निलंबित करण्याची मागणी

मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील (कायदा व सुव्यवस्था ) यांना निलंबित करण्याची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मागणी केली आहे. आंबेडकर यांनी ही मागणी आज अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

गुप्तचर यंत्रणांनी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था ) यांना घटनेच्या चार दिवस आधी म्हणजेच चार एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानासमोर अनुचित प्रकार घडू शकतो, असे पत्र दिले होते. यासंदर्भात योग्य कार्यवाही करणे गरजेचे असतानाही विश्वास नांगरे पाटील यांनी तसे केली नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच आंबेडकर यांनी पुढे बोलताना विश्वास नांगरे-पाटलांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचेही नमूद केले.

या घटनेच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे प्रमुख ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांनाच करणे आक्षेपार्ह आहे. त्यांना तातडीने या पदावरून हटवून त्यांचीच चौकशी करावी, अशी मागणी आंबेडकरांनी केली. विश्वास नांगरे पाटलांनी माहिती दडवून ठेवली म्हणून त्यांना निलंबित करावे, अशी मागणीही आंबेडकर यांनी शासकीय विश्राम गृहातील पत्रकार परिषदमध्ये केली आहे.

केवळ सिल्व्हर ओकच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘मातोश्री’ बंगला तसेच ‘वर्षा’ हे शासकीय निवासस्थान, आझाद मैदान, मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान व वांद्रे येथील खासगी निवासस्थान या ठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलन करू शकतात, असा इशारा देणारे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपर पोलीस आयुक्त निशीथ मिश्र यांनी सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चार एप्रिल रोजी पाठविले होते. त्यामुळे सिल्व्हर ओकसहीत सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ का करण्यात आली नव्हती, असा सवाल उपस्थित होतो, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दररोज सकाळ व संध्याकाळी गुप्तचर विभाग राज्याचे पोलीस प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल देत असतात. त्यामुळे सदर घटनेचा अहवाल गुप्तचर खात्याने त्यांना दिला की नाही याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *