कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील नवीन बसस्थानकाजवळील दवाखान्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत कर्मचाऱ्याला मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर डॉक्टर सचिन देशमुख यांच्या बेडरुमचा दरवाजा तोडून आता प्रवेश करून त्यांच्या सात वर्षांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लाऊन सुमारे सात लाखांचा ऐवज पळविला. ही घटना आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांच्या वाहनाचं सायरन ऐकून चोरट्यांनी पळ काढला.
आखाडा बाळापूर येथील नवीन बसस्थानक परिसरात डॉ. सचिन देशमुख यांचा दवाखाना आहे. या दवाखान्याच्या वरच्या मजल्यावर डॉ. देशमुख हे कुटंबासह राहतात. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास काही चोरटे एका स्कॉर्पिओ वाहनाने दवाखान्याजवळ आले. त्यांनी दवाखान्याच्या पाठीमागील ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तेथे असलेल्या कर्मचारी विशाल होळगे याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
चोरट्यांनी दवाखान्याच्यावर असलेल्या डॉ. देशमुख यांच्या बेडरुमच्या दरवाज्यावर लाथ मारून दरवाजा तोडला. यावेळी डॉ. देशमुख कुटुंब जागे झाले. बेडरुमध्ये आलेल्या दोन चोरट्यांनी डॉ. देशमुख यांच्या सात वर्षाचा मुलगा श्रीयांश देशमुख याला ताब्यात घेऊन त्याच्या गळ्याला चाकू लावला. ‘तुम्हारे पास जो है वो जल्दी दो, वरणा बच्चे को मार डालेंगे’, अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या डॉ. देशमुख कुटुंबियांनी त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांना दिली.