ताज्याघडामोडी

४ दिवस नॉट रिचेबल, जामीन मिळताच सोमय्या मुंबईत दाखल

आयएनएस विक्रांत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज अटकपूर्व जामीन मिळाला. गेल्या चार दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले सोमय्या जामीन मिळताच मुंबईत दाखल झाले.

विमानतळावरुनच त्यांनी माध्यमांशी संवाद साधत न्यायालयाचे आभार मानले. तसंच कुठलाही गुन्हा केलेला नसताना खोटे आरोप करुन तुम्ही माझं तोंड बंद करु शकत नाही. मी उद्धव ठाकरे सरकारमधील डर्टी मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणारच, अशी डरकाळीही त्यांनी फोडली.

आयएनएस विक्रांतमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सोमय्यांनी अटकपूर्व जामीनसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण सत्र न्यायालयाने सोमय्यांना जामीन अर्ज फेटाळून लावला. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल होते.

सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर सोमय्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. आज सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांना जामीन मंजूर केला.

हायकोर्टाकडून किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर होताच संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते मुंबई विमानतळावर अवतरले. मी चार दिवस कुठे गेलो, हे सांगणार नाही. फक्त होमवर्क करण्यासाठी मी भूमिगत झालो होतो, एवढंच सांगेन. मी आयएनएस विक्रांत प्रकरणात दमडीचाही घोटाळा केला नाही, असं सांगतानाच राऊत जरी आरोप करत असले तरी या सगळ्या प्रकरणी उद्धव ठाकरे मास्टरमाईंड असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

“आएनएस विक्रांतमध्ये एक रुपयाचाही घोटाळा केला नाही. राऊतांकडे कोणताही पुरावा नाही, त्यांनी केवळ स्टंटबाजी केली. माझा न्यायालयावर विश्वास आहे. आज न्यायालयाने माझा जामीन मंजूर केला. याबद्दल मुंबई हायकोर्टाच्या न्यायमुर्तींचे मी आभार मानतो. मात्र माझ्यावर गुन्हे दाखल करुन माझं तोंड बंद करणार असाल तर मी ठाकरे सरकारला इशारा देतो, आणखी जोमाने मी सरकारमधील डर्टी मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढेन”, असं सोमय्या म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *