ताज्याघडामोडी

राज्यातील 4 बँकांना RBIचा दणका

आरबीआय च्या (RBI) नियमांचं पालन न केल्यानं चार सहकारी बॅंकांना दणका दिला आहे. सहकारी बँकांना नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळं तब्बल 4 लाखांचा दंड सुनावला आहे. या चार बँकांमध्ये महाराष्ट्रातील तीन तर मध्यप्रदेशातील एका बँकेचा समावेश आहे.

आरबीआयनं ज्या बँकांना दंड ठोठावला आहे त्यामध्ये नाशिकमधील अंदरसूल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, लातूरमधील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक आणि मध्य प्रदेशातील जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादीत या बँकांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँकेने चार सहकारी बँकांना नियमांचं पालन न केल्याबद्दल एकूण 4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मध्यवर्ती बँकेनं जारी केलेल्या चार स्वतंत्र स्टेटमेंटनुसार, हा दंड नियमांकडे दुर्लक्ष करत पालन न केल्यामुळं लावण्यात आला आहे. बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेले व्यवहार किंवा करार यांच्या वैधतेबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा यातून कोणताही हेतू नाही, असं आरबीआयच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील नाशिकमधील अंदरसूल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला दीड लाख रुपये आणि लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर महाराष्ट्रातील नांदेड मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील शहडोल येथील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वी 5 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँकेनही अनेक बँकांना दंड ठोठावला होता. त्यावेळी, आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात स्पष्ट करण्यात आलं होतं की, फलटणस्थित यशवंत सहकारी बँक लिमिटेडला उत्पन्न, मालमत्ता वर्गीकरण, तरतूदी आणि इतर संबंधित समस्यांवरील निर्देशांचं पालन न केल्याबद्दल 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

याशिवाय अशाच एका प्रकरणात मुंबईतील कोकण मर्कंटाइल को. ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. दुसरीकडे कोलकातास्थित समता को. ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *