ताज्याघडामोडी

२०२२ साली होणाऱ्या वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; भारताच्या ग्रुपमध्ये हे संघ

पुढील वर्षी २०२२ साली वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिजमधील चार शहरात आयोजित केली जाणार आहे. भारताचा समावेश ग्रुप बी मध्ये करण्यात आला असून या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि पदार्पण करणाऱ्या युगांडाचा समावेश आहे.

१९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. यात एकूण ४८ सामने होतील. गतविजेते बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा आणि युएईला ग्रुप ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. तर ग्रुप सी मध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा समावेश आहे. ग्रुप डी मध्ये वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि स्कॉटलंड याचा समावेश आहे. सक्तीच्या क्वारंटाइन नियमांमुळे न्यूझीलंडने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्पर्धेचे आयोजन एटीगा आणि बारबुडा, ग्याना, सेंट किट्स आणि नेविस, त्रिनिदाद आणि टोबॅगो हे करणार आहेत.

प्रत्येक ग्रुपमधून दोन संघ सुपर लीग स्पर्धेत पोहोचतील. ही स्पर्धे २३ दिवसांची असेल. सेमीफायनल एक आणि दोन फेब्रुवारी रोजी तर फायनल ५ फेब्रुवारी रोजी सर व्हिव्हिएन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. भारताच्या ग्रुप फेरीतील लढती पुढील प्रमाणे…

१५ जानेवारी- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

१९ जानेवारी- आयर्लंडविरुद्ध

२२ जानेवारी- युगांडा

भारतीय संघाला ग्रुप फेरीत किमान दोन सामने जिंकावे लागतील. असे झाले तरच भारत पुढील फेरीत प्रवेश करेल. गेल्या स्पर्धेत भारत फायनलमध्ये पोहोचला होता. पण बांगलादेशकडून भारताचा पराभव झाला होता. यावेळी भारताला नवा कर्णधार मिळाला असून संघाला विजेतेपदाची आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *