गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळूच्या वादातून युवकाचा खून; सहाजणांवर गुन्हा

गेल्या वर्षी वाळू काढण्याच्या वादात झालेल्या खुनी हल्ल्याच्या रागातून प्रशांत भोसले याच्यासह सहाजणांनी युवकाचा तलवार, कोयत्याने वार करून खून केल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे गुरुवारी रात्री घडली.

याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात सहाजणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगावमध्ये तणावाचे वातावरण असून, गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

वैभव विकास ढाणे (वय 28) असे मृत युवकाचे नाव असून, प्रशांत पांडुरंग भोसले, सौरभ संजय भोसले, किरण संजय भोसले, हुसेन बेग, मनोज शिरतोडे व रोहन सुभाष भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम ढाणे याने फिर्याद दिली आहे.

जळगावमध्ये वैभव ढाणे व प्रशांत भोसले यांच्यामध्ये गावातील वाळूवरून वाद होते. गेल्या वर्षी वैभव ढाणे, विजय शिवाजी जाधव व नीलेश विठ्ठल पवार यांनी प्रशांत भोसले याच्यावर चाकूने वार केले होते. त्यामध्ये प्रशांत भोसले हा जखमी झाला होता. त्याने दिलेल्या तक्रारीवरून वैभवसह तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाबद्दल कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुरुवारी रात्री वैभव हा भाऊ शुभमसह शेतात पाणी देण्यासाठी जाणार होता. जेवण केल्यानंतर वैभव पायीच भैरोबा मंदिराकडे चालत गेला. शुभम तंबाखूची पुडी आणण्यासाठी बाहेर गेला होता. घरी आल्यानंतर त्याने वैभव याला हाक मारली.

मात्र, तो भैरोबा मंदिराकडे चालत गेल्याचे सांगितल्याने शुभम दुचाकीवरून मंदिराकडे गेला, त्यावेळी दुचाकीच्या हेड लाइटच्या उजेडात प्रशांत भोसले, सौरभ भोसले, किरण भोसले, हुसेन बेग, मनोज शिरतोडे व रोहन भोसले हे तलवार व कोयत्यांनी वैभववर वार करीत असल्याचे दिसले. शुभमला पाहताच मारेकऱयांनी पोबारा केला.

दरम्यान, नातेवाईक मदन जाधव यांच्यासमवेत शुभमने कारमधून वैभवला सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर शुभमने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी पहाटे कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन सावंत तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *