ताज्याघडामोडी

“…नाहीतर आम्ही ‘मातोश्री’वर मोर्चा काढू, शिवसेनेवर बहिष्कार टाकू”; ब्राह्मण समाजाचा इशारा

शिवसेनाचे प्रवक्ते विनायक राऊत यांनी आठ दिवसांत ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा ‘मातोश्री’ वर मोर्चा काढू असा इशारा ब्राह्मण समाज समन्वय समितीने दिला आहे. “शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही” असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने त्यावर आक्षेप घेतला आहे.

काल म्हणजेच मंगळवारी (२२ मार्च २०२२ रोजी) औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांनी शेंडी जाणव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असे संतापजनक वक्तव्य करून समस्त ब्राह्मण समाजाचा व हिंदू धर्माचा घोर अपमान केल्याचा आरोप ब्राह्मण समाज समन्वय समितीने केलाय.

शिवसेना पक्षातर्फे व शिवसेनेच्या शिर्षस्थ नेत्यांतर्फे असा उल्लेख करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील महाराष्ट्राच्या विधानसभेत जाहीर सभेत तसेच पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा हे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांतर्फे करण्यात आले आहे, असं ब्राह्मण समाज समन्वय समितीने म्हटलंय.

शेंडी-जानव्याचे हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही मग टोपी-बुरख्याचे हिंदुत्व शिवसेनेला मान्य आहे का?, शेंडी जाणव्याचे हिंदुत्व मान्य नाही पण शेंडी जाणव्याचे मतदान शिवसेनेला मान्य आहे अशी दुटप्पी भूमिका कशी? हा वाक्यप्रचार वापरायचा पायंडा पाडत आहात का?, असे प्रश्न ब्राह्मण समाज समन्वय समितीने शिवसेनेला विचारले आहेत.

“या प्रश्नांची उत्तरे शिवसेनेने ब्राह्मण समाजाला देणे बंधनकारक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः औरंगाबाद शहरात एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ब्राह्मण समाज सदैव शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आहे. ब्राह्मण समाजाच्या अनेक अंगीकृत संघटना, ब्राह्मण समाजातील अनेक राजकीय नेते शिवसेना पक्षामध्ये वर्षानुवर्षे सक्रिय कार्यरत आहेत.

मात्र यापुढे शिवसेना पक्षाला मतदान करताना ब्राह्मण समाजाला विचार करावा लागेल,” असे समन्वय समितीने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. ब्राह्मण समाजाचा वारंवार अपमान करून आपला नेमका कोणाला खूष करण्याचा हेतू आहे? हे स्पष्ट झाले पाहिजे, असंही समन्वय समितीने म्हटलंय.

“सर्वप्रथम खासदार विनायक राऊत यांनी संपूर्ण ब्राह्मण समाजाची विनाविलंब जाहीर माफी मागावी अशी आमची प्राथमिक मागणी आहे अन्यथा ब्राह्मण समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल व येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ब्राह्मण समाज सुज्ञ मतदार म्हणून शिवसेना पक्षावर पूर्णपणे बहिष्कार टाकेल,” असा इशाराच समन्वय समितीने दिलाय. “आम्ही आठ दिवसांचा अवधी देतो जाहीर माफी मागितली नाही तर मातोश्रीवर मार्चा काढू असा इशारा आम्ही आज देऊ इच्छितो, असं समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *