कोरोनाचा आलेख उतरता असून रुग्णसंख्याही रोडावली आहे. दोन वर्षांपासून धुमाकूळ घालणारा कोरोना आता कुठे आटोक्यात येत असल्याचे दिसताच केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून लागू असणारे कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधी आदेश जारी केले आहेत.
जनता कर्फ्यू लागू करून आज बरोबर दोन वर्ष झाले आहेत. या काळात रुग्णसंख्या कोट्यवधींचा आकडा पार करून गेली. मात्र आता तिसरी लाट कमी झाली असून दररोज हजारांमध्ये रुग्ण सापडत आहेत. तसेच लसीकरणामुळे मृत्यूदरही कमी झाला आहे. हिच वेळ साधत केंद्राने 31 मार्चपासून देशातील कोविड-19 प्रतिबंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्बंध हटणार असले तरी सहा फुटांचे अंतर आणि मास्क घालणे या दोन गोष्टी पाळाव्या लागणार आहेत.
निर्बंध हटवण्यासोबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसाठी डीएण कायदा लागू करणारा आदेशही मागे घेतला आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘डीएम’ कायद्यान्वये जारी मार्गदर्शक तत्वे काढण्याचे आदेश दिले आहेत.
23 हजार सक्रिय रुग्ण
दरम्यान, देशात गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 778 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 87 आहेत. लसीकरणही वेगाने सुरू असून आतापर्यंत 181.56 कोटी कोरोना डोस देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले आहे.