ताज्याघडामोडी

महाराष्ट्राच्या नादाला लागल्यावर काय होतं हे दिल्लीश्वरांना कळू द्या, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या माध्यमातून भाजपचा सुरू असलेला छूपा प्रचार, ‘एमआयएम’ने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या ऑफरच्या माध्यमातून शिवसेनेला मुस्लिम धार्जिणे ठरविण्याचा भाजपचा डाव याचा समाचार घेत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा हिजाब उतरवला.

कश्मीरी पंडितांवर अत्याचार झाले तेव्हा तिथे भाजपने पाठिंबा दिलेल्या पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचेच सरकार होते. आता जो मायेचा पूत त्यावर अश्रू ढाळतोय त्यात तेव्हा ब्र काढण्याही हिंमत नव्हती, असे ठणकावताना तेव्हा एकच आवाज…ज्यांनी गर्जना केली ते होते हिंदुहृयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, हा हिंदुत्वाचा अभिमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांत जागवला.

राजकारणासाठी हिंदुत्वाचा बुरखा पांघरणारे नवहिंदू हे हिंदुत्वाचा, छत्रपती शिवरायांचा आणि शिवसेनेचा भगवा बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिजाब पांघरलेल्या या नवहिंदूंना राजकारणातून नेस्तनाबूत करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना दिले.

औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकणार्‍या ‘एमआयएम’सोबत मेलो तरी जाणार नाही, असे ठणकावून सांगताना भाजपचे हे डाव ‘शिवसंपर्क अभियाना’च्या माध्यमातून जनतेसमोर पोहोचवा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना केले.

शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’ उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. या अभियानाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे शिवसेना खासदार तसेच संपर्कप्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना मुस्लिम धार्जिणी झाली आहे असा गैरसमज पसरवण्याचा भाजपचा डाव आहे. शिवसेनेला जनाब म्हणायला यांनी सुरुवात केली आहे.

आपल्याला ते हिंदूविरोधी ठरवू पाहताहेत. एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की ज्यामुळे सगळे संमोहित होतील आणि वस्तुस्थिती विसरून जातील. आधी इस्लाम खतरे में है अशी बांग दिली जायची, आता हिंदुत्व खतरे में है, अशी एक नवीन बांग भाजपने द्यायला सुरुवात केली आहे. अशा वेळी सत्य काय आहे हे गावोगावी आणि घरोघरी जाऊन आपल्याला सांगयला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *