पुण्यात येऊन गेल्या दीड वर्षांपासून MPSC चा अभ्यास करणार्या एका तरुणाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्रिभुवन विठ्ठल कावले (वय ३०, रा. गांजवे चौक, शास्त्री रोड, मुळ रा. जालना) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिभुवन कावले हा मुळचा जालना येथील राहणारा होता. त्रिभुवन हा स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी गेल्या वर्षी जानेवारी २०२१ पासून पुण्यात आला होता. तो मित्रांबरोबर गांजवे चौकात कॉट बेसीसवर रहात होता. त्रिभुवन मंगळवारी एकटाच रुमवर होता.
मंगळवारी दुपारी त्याचे मित्र रुमवर आले, तेव्हा रुम आतून बंद होती.आवाज देऊनही त्रिभुवन दरवाजा उघडत नसल्याने शेवटी त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला.तेव्हा त्यांना त्रिभुवन याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.त्याच्या मित्रांनी ही बाब तातडीने विश्रामबाग पोलिसांना कळविली .आत्महत्या करण्यापूर्वी त्रिभुवन याने लिहिलेली चिठ्ठी सापडली.त्यात त्याने आपण नैराश्यातून हे पाऊल उचलले असून त्याला कोणी जबाबदार नाही, असे चिठ्ठी लिहिलेले होते.विश्रामबाग पोलिसांनी आकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.