ताज्याघडामोडी

वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; रिक्षा चालकाला चक्क हेल्मेट न घातल्याचा दंड!

वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन दंड आकारणी प्रणाली सुरू केली खरी, मात्र अनेकदा ही दंड आकारणी काहींना डोकेदुखी ठरत असते.

त्याचे ताजं उदाहरण कल्याण शहरात पाहायला मिळाले आहे. कल्याण पूर्व मलंग रोड द्वारली गावात राहणारे गुरुनाथ चिकणकर या रिक्षा चालकाला ऑनलाइन चालान आले. त्याने अॅपवर तपासून पाहिले असता चक्क हेल्मेट परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांनी 500 रुपयांचा दंड आकाराल्याचे त्याला दिसून आलं.

मुंबईच्या कांदिवली भागात 3 डिसेंबर रोजी एक दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करत होता, त्याचा फोटो वाहतूक पोलिसांनी काढला. त्याचे हे चलन रिक्षा चालकाला आले असल्याचे समोर आले आहे. या दुचाकी चालकाचा दंड ऑनलाइन प्रणालीच्या इ चलनद्वारे रिक्षा चालक गुरुनाथ यांना आकारण्यात आला आहे.

सुरुवातीला मोबाईलवर या दंडासंबंधी माहिती आल्यानंतर रिक्षा चालक गुरुनाथ यांना धक्काच बसला. त्यांनी या प्रकरणी कल्याण वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता त्यांना ठाण्याला जाण्यासाठी सांगण्यात आले.

मात्र माझी चूक नसतांना मी ठाणे येथे का जावे, वाहतूक पोलिसांनी केलेली चूक त्यांनी सुधारून द्यावी अशी मागणी गुरुनाथ यांनी केली आहे. या सगळया प्रकरणामुळे मानसिक त्रास झाला असल्याचं गुरुनाथ यांचं म्हणणं आहे.आता या प्रकरणात लवकरात लवकर आपल्याला आलेला दंड आणि नोटीस रद्द करण्याची मागणी रिक्षा चालक गुरुनाथ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *