ताज्याघडामोडी

वीज वितरणच्या सहाय्यक अभियंत्याला दणका; लाच घेताना रंगेहात पडकलं!

पोलिसांनी कारवाईबाबत दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे महावितरण कंपनीच्या ग्रामीण विभागात ट्रान्सफॉर्मर लोड-अनलोडिंग रिप्लेसमेंटचे काम करतात. तक्रारदाराने वीज मंडळाची कामे पूर्ण करुन बिले मंजुरीसाठी पाठवली.

ही बिले मंजूर करण्याचं काम सहाय्यक अभियंता काशिदकर यांच्याकडे होते. तक्रारदारांच्या पूर्वीच्या पूर्ण झालेल्या कामाच्या बिलाबाबत त्यांनी काशिदकर यांची २३ फेब्रुवारी रोजी भेट घेतली असता बिले मंजूर करण्यासाठी त्यांनी १ लाख रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदारांनी त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याच दिवशी अर्ज दिला. तक्रारदारांच्या अर्जांची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असता पूर्वीच्या ७५ हजार रुपयांच्या बिलाचे नंतर बघू सध्याच्या ट्रान्सफॉर्मर लोडिंग-अनलोंडिंग रिप्लेसमेंट कामाच्या बिलाच्या मंजुरीसाठी २५ हजार रुपये मागितल्याचं स्पष्ट झालं.

तसंच तडजोडीनंतर काशिदकर यांनी तक्रारदारांकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

सरकारी पंचांच्या उपस्थितीत आज २ मार्च रोजी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना काशिदकर यांना रंगेहात पकडण्यात आलं. पोलीस उपअधीक्षक अदिनाश बुधवंत, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस फौजदार बंबरगेकर, हेड कॉन्सटेबल शरद पोरे, नवनाथ कदम, मयूर देसाई, रुपेश माने यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *