गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दाऊदने भारतात हल्ले करण्यासाठी तयार केले विशेष युनिट

डी-गँगच्या कटाची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली असून आपल्या एफआयआरमध्ये या कटाचा उल्लेख राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) केला आहे.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, भारतात हल्ले करण्यासाठी एक विशेष युनिट डी-गँगचा म्होरक्या आणि भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊदने तयार केले आहे. ज्यांचे टार्गेट मोठे नेते आणि सेलिब्रिटी आहेत.

एनआयएच्या एफआयआरनुसार दाऊदला त्याच्या विशेष युनिटच्या माध्यमातून भारतात हल्ले करायचे आहेत आणि त्याचे लक्ष दिल्ली आणि मुंबई येथील बडे नेते आणि मोठया हस्ती आहेत. दाऊदला स्फोटक आणि प्राणघातक शस्त्रांनी सज्ज असलेल्या या युनिटच्या माध्यमातून भारतातील अनेक भागात हल्ले करायचे आहेत. तपास संस्थेच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांचा उद्देश भारताच्या विविध भागात हिंसाचार भडकावण्याचा आहे.

एनआयएच्या खुलाशाच्या एक दिवस आधी ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात, ईडी इक्बालची पुढील 7 दिवस म्हणजे 24 फेब्रुवारीपर्यंत चौकशी करेल. दाऊद आणि त्याच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध ईडीने अलीकडेच मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार हे लोक दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवत आहेत.

दरम्यान ईडीचे सहाय्यक संचालक डीसी नाहक यांनी सांगितले की, एका बिल्डरच्या सप्टेंबर 2017 मधील तक्रारीवरून इक्बाल कासकर, मुमताज अजाज शेख, इसरार जमील सय्यद आणि इतर काही जणांविरुद्ध वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एका बिल्डरने आपल्या तक्रारीत इक्बाल आणि इतरांनी त्याच्याकडून वसुलीची रक्कम मागितल्याचे म्हटले आहे. 2015 मध्ये बिल्डरचा एक दलाल सय्यदला भेटला. तो दाऊदचा भाऊ असल्याचे सय्यदने सांगितले होते. त्याने इक्बालला बिल्डरशी बोलायला लावले आणि वसुलीची रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *