ताज्याघडामोडी

..अन् गृहमंत्र्यांनीच घातली काॅलेजच्या प्रवेशद्वारावर गस्त, पोलिसांनी १६ तरुणांना घेतलं ताब्यात

सातारा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुलींच्या छेडछाडीचे आणि वादावादीचे प्रकार घडत असल्याने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी दुपारी अचानक काॅलेजच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांसोबत गस्त घातली.

त्यावेळी महाविद्यालय परिसरात विनाकारण रेंगाळणाऱ्या १६ युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अचानक गृहमंत्रीच काॅलेज परिसरात आल्याने महाविद्यालयीन युवकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

सातारा शहरामध्ये काॅलेजच्या प्रवेशद्वाराजवळ गेल्या काही दिवसांपूर्वी तुंबळ हाणामारी झाली होती. एकमेकांचा पाठलाग करत महाविद्यालयीन युवक एका दुकानात घुसले होते. यामध्ये दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच, महाविद्यालयात जात असताना एका तरुणीचा विनयभंगही करण्यात आला होता.

या साऱ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी काही मोजक्याच पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेतलं. वायसी काॅलेज, डीजी आणि छत्रपती शिवाजी महाराज काॅलेजवर अचानक गस्त घातली. नेमकं याचवेळी काॅलेज सुटलं होतं.

काही रोडरोमिओ ये-जा करणाऱ्या मुलींकडे पाहात होते. तर काहीजण मोटारसायकलवर टेकून उभे होते. अशा १६ तरुणांची पोलिसांनी धरपकड करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.

साध्या वेशात पोलीस असल्यामुळे मुलांना नेमक काय चाललं, हे बराचवेळ समजलं नाही. पण जेव्हा पाठलाग करून मुलांची धरपकड पोलीस करू लागले तेव्हा मात्र, मुलांना पोलीस आले असल्याची जाणीव झाली. अशा प्रकारे अचानक गृह मंत्र्यांनी पोलिसांसोबत गस्त घातल्याने छेडछाड आणि वादावादीला आळा बसेल, असे महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *