ताज्याघडामोडी

बायको माहेरी गेल्याने पती संतापला; सासरी जाऊन सासू, मेव्हण्याला संपवलं, नंतर उचललं धक्कादायक पाऊल

पत्नी माहेरी निघून गेल्याचा संताप अनावर झाल्याने सासू आणि मेव्हण्याला पेट्रोल टाकून जिवंत पेटविले. नंतर स्वत:ही जाळून घेत आत्महत्या केली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडविणारी ही घटना वरुड तालुक्यातील वंडली येथे सोमवारी पहाटे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सासू लता सुरेश भोंडे (४७), मेव्हणा प्रणय सुरेश भोंडे (२२) आणि जावई आशिष ठाकरे असे या घटनेतील मृतांची नावे आहेत. वरुडच्या आशिषने वंडलीतील लता यांच्या मुलीशी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला. काही दिवसात आशिष आणि त्याच्या पत्नीत वाद होऊ लागले. दारू पिऊन मारहाण करण्याचे प्रकार सातत्याने घडू लागल्याने तिने माहेर गाठले. तरीही त्रास संपला नाही. वंडलीत येऊन आशिष हा सतत त्रास देऊ लागला. परिणामी लता यांनी मुलीला मावशीकडे राजुरा बाजारला पाठविले. रविवारी आशिष मित्राच्या दुचाकीने वंडलीला आला. वाटेत गाडीत पेट्रोल भरताना काचेच्या बाटलीत शंभर रुपयांचे अधिकचे घेतले. घरी येताच त्याने लता आणि प्रणयसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. जीवे मारण्याची धमकीही दिली.

नंतर निघून गेला. पण त्याच्या मनातील राग शांत झाला नव्हता. सोमवारी पहाटे तो परत आला. लता आणि प्रणयच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यानंतर मावस सासरे दिनेश निकम यांना फोनवरून दोघांनाही पेटवून ठार मारल्याचे सांगितले. एवढ्यावरच न थांबता आपणही आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. यानंतर आशिषने सोबत आणलेले पेट्रोल स्वतःवर ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे घरातून धूर निघू लागला. काही नागरिकांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना धक्कादायक प्रकार लक्षात आला.

पोलिसांनी वंडली गावात पोहोचून तीनही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. याप्रकरणी दिनेश निकम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत आशिष ठाकरे याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचा हा क्रूर खेळ सुरू असताना लता यांच्या ९० वर्षांच्या सासू चंद्रकला भोंडे घरात झोपल्या होत्या. त्या घरात असल्याची आशिषला माहिती नव्हती. यातून चंद्रकला यांचा जीव वाचला. पण, घरातील सून आणि नातू गेल्याचे कळताच त्यांनी हंबरडा फोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *