गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

50 लाखांसाठी फॉर्च्यूनर गाडीसह व्यापाऱ्याचं अपहरण; 10 तास रंगलं थरारनाट्य

मुंबईत एका ड्रायफ्रुट व्यापाऱ्याला आणि त्यांच्या ड्रायव्हरला फॉर्च्यूनर गाडीसह अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

अपहरणकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच, मुंबईतील समता नगर पोलिसांनी अवघ्या 10 तासांतच बोरिवली परिसरातून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. ड्रायफ्रुट व्यापाऱ्यासह चालक सुखरूप बचावला आहे. पोलिसांनी फॉर्च्यूनर गाडीही ताब्यात घेतली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी अपहरण झालेले ड्रायफ्रुट व्यापारी धवल रमेश अकबारी (33) आपल्या चालकासह फॉर्च्यूनर गाडीतून बांद्रा खेरवाडी परिसरातून जात होते.

दरम्यान तीन आरोपींनी जबरदस्तीने त्यांचा रस्ता अडवला आणि कारमध्ये शिरले. आरोपींनी ड्रायफ्रुट व्यापाऱ्यासह त्यांच्या चालकाचं अपहरण केलं.

अपहरणकर्त्यांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी देत हायवे रस्त्यावरून त्यांना कांदीवली परिसरातील ठाकूर विलेज याठिकाणी घेऊन गेले. याठिकाणी गेल्यानंतर आरोपींनी व्यापाऱ्याकडे 50 लाखांची खंडणी मागितली.

तसेच पैसे न दिल्यास जीवे मारू अशी धमकी दिली. पण एवढी मोठी रक्कम एकाच वेळी देणं शक्य नसल्याचं व्यापाऱ्यानं सांगितल्यानंतर, खंडणीची रक्कम 5 लाख रुपये ठरवण्यात आली.

यानंतर अपहरणकर्त्यांनी पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी व्यापाऱ्याची सुटका केली. पण कारचालक आणि फॉर्च्यूनर गाडी आपल्याच ताब्यात ठेवली. आरोपींच्या तावडीतून सुटका होताच, व्यापाऱ्याने थेट समतानगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी बोरिवली परिसरातून तिन्ही अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *