ताज्याघडामोडी

उद्योग क्षेत्रातील कामगारांना कोविड लशीची दुसरी मात्रा तातडीने द्या

जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांमधील अधिकारी, कामगारवर्गाला कोविड लशीची दुसरी मात्रा तातडीने देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज उद्योगांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या आभासी (ऑनलाईन) पद्धतीने झालेल्या बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातून झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, उद्योग विभागाचे सह संचालक सदाशिव सुरवसे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय देशमुख, अविनाश हतगल, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते. एमसीसीआयएच्या सहकार्याने या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

संपूर्ण कोविड लसीकरण हे कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाय असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोविड संसर्ग टाळण्यासाठी सर्व उद्योगांमधील तसेच औद्योगिक आस्थापनांमधील सर्व अधिकारी आणि कामगारवर्गाचे लसीकरण पूर्ण होणे आवाश्यक आहे.

आकडेवारीनुसार औद्योगिक आस्थापनांमधील लसीकरणाचे प्रमाण चांगले दिसत असले तरी अजूनही दुसरी मात्रा न घेतलेल्या उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करा.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे अजूनही घरून काम (वर्क फ्रॉम होम) सुरू असले तरी त्यांनाही लशीची दुसरी मात्रा दिली जाईल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घ्यावी. लसीकरणाची बाब आवश्यक केल्यास या मोहिमेला गती मिळू शकेल, असेही ते म्हणाले. संपूर्ण लसीकरण झाले तरी मुखपट्टीचा (मास्क) वापर, नियमितपणे हात स्वच्छ करणे, सुरक्षित शारीरिक अंतर राखणे आदी कोविड सुसंगत वर्तणूक सुरुच ठेवणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी उद्योगांच्या प्रतिनिधींनी लसीकरणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कोविड निर्बंधामुळे उद्योगांना अडचणी आल्या तरी उद्योगांनी स्वत:हून ‘लसीकरण नाही तर प्रवेश नाही’ हे सूत्र राबवले, त्यामुळे कोरोनाला बराच अटकाव झाला असे यावेळी सांगण्यात आले. उद्योगांच्या अन्य समस्यांच्या अनुषंगाने स्वतंत्र बैठक लवकर घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *