सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांच्या नव्या पक्षाची स्थापना करोनामुळे लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांनी आज नगरमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद घेऊन आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त आहेत. त्यामुळे त्याही लवकरच आपल्यासोबत येणार आहेत, असे मुंडे यांनी सांगितले. त्या मंत्र्यांची नावे जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, त्यातील एक राष्ट्रवादीचा तर दुसरा शिवसेनेचा मंत्री असल्याचे त्या म्हणाल्या.
आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही राज्यभर दौरा सुरू केलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असता माझे पती मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी माझी सभा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, न डगमगता माझे कार्य पुढे सुरू ठेवणार आहे. आमच्या पक्षात अनेक संघटना तसेच इतर पक्षाचे लोकही येणार आहेत. त्यासाठी आमची त्यांच्यासोबत बोलणी सुरू आहे. करोनाचे संकट कमी झाल्यावर नगरमध्येच नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.