ताज्याघडामोडी

‘मशाल’ चिन्हासाठी समता पार्टीचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “बिहारहून आमचे सदस्य…”

निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘धनुष्यबाण’ चिन्ह गमावलं आहे.त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर राजकीय समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. दरम्यान, शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरू असताना निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे तात्पुरतं निवडणूक चिन्ह देऊ केलं होतं.

याच ‘मशाल’ चिन्हावर ठाकरे गटाने अंधेरी पोटनिवडणूक लढवली होती. पण आता ‘मशाल’ चिन्हही अडचणीत सापडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आधी निवडणूक आयोगानं हे चिन्ह बिहारमधील समता पार्टीला दिलं होतं. त्यामुळे ‘मशाल’ चिन्हासाठी समता पार्टी आक्रमक झाली आहे. आमचं चिन्ह आम्हाला परत मिळावं, अशी मागणी समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी केली. आज त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली आहे.

भेटीनंतर उदय मंडल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘मशाल’ पक्षचिन्हासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी भूमिका उदय मंडल यांनी मांडली. यावेळी ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी आपल्या मुलाला बिहारला पाठवलं होतं. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना विचारू इच्छित आहे की, तुम्ही आदित्य ठाकरे यांना कोणतं समीकरण जुळवण्यासाठी बिहारला पाठवलं होतं? आदित्य ठाकरे जर महाराष्ट्रातून बिहारला जाऊ शकतात. तर बिहारहून समता पार्टीचे सदस्य महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देऊ शकतात.”

निवडणूक आयोगासमोरील लढाईत एकनाथ शिंदे यांचा विजय हा सत्याचा विजय झाला आहे. खोटेपणा हरला आहे, असंही मंडल म्हणाले. “मशालची लढाई ही आमची स्वत:ची लढाई आहे. एकनाथ शिंदे यांना जे हवं होतं, ते त्यांना मिळालं आहे. आम्हाला जे पाहिजे ते मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. हे आमचं पुढचं पाऊल असणार आहे,” असा इशारा समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी दिला. त्यामुळे ‘मशाल’ हे चिन्हही उद्धव ठाकरेंच्या हातून जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *