तहसीलदारांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र
पंढरपूर शहराच्या सौदर्यात भर घालणारा व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शहरी लोकवस्तीत असलेल्या एकमेव विशाल तलाव म्हणून यशवंतराव चव्हाण तलाव तथा यमाई तलाव परिसर ओळखला जातो.जवळपास पावणेदोनशे एकर इतक्या विस्तीर्ण तलाव सध्या पाण्याने तुडूंब भरला आहे.या तलावाच्या ठिकाणी सरोवर सर्वधन विकास योजनेअर्तगत विविध विकास कामासाठी सन २००८ मध्ये सुमारे ६ कोटी रुपयांच्या विकास योजनेस मंजुरी देण्यात आली होती.या पैकी पहिल्या टप्प्याचे काम पूर्णही झाले आहे.या ठिकाणी वर्षातून केवळ तीन महिने तेही विशेष परवानगी काढून मासेमारी करण्यात यावी अशी अट त्यावेळी शासनाने घातलेली होती.पंढरपूर नगर पालिकेकडून दोन महिन्यापूर्वी सदर तलावाच्या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती.
या निविदेबाबत कार्यवाही अंतिम मंजुरीच्या टप्प्यात असतानाच तहसीलदार सुशील बेलेकर यांनी दिनांक २३ डिसेंबर २०२१ रोजी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवत यमाई तलाव हा नगर पालिका,जलसंधारण विभाग,किंवा मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या अखत्यारीत येत नसून यमाई तलावाच्या ठिकाणी मासेमारीचा ठेका मंजूर करण्याचा अधिकार नगर पालिकेस नाही असे या पत्रात नमूद केले आहे.
या बाबत माहिती घेण्यासाठी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.