गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तोतया NCB अधिकाऱ्याच्या कारवाईला घाबरून अभिनेत्रीची आत्महत्या

सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि त्यानंतर कार्डिलिया क्रूजवरील ड्रग्ज पार्टीवर NCB ने कारवाई केली होती.

यानंतर NCB ची दहशत ड्रग्ज पार्टीमध्ये सहभागी होणाऱ्या बॉलीवूड कलाकारांमध्ये पहायला मिळाली. मात्र हीच संधी साधून काही भामटे NCB अधिकारी असल्याचं सांगत कारवाईच्या नावाखाली खंडणी उकळत असल्याचे समोर आले आहे. याच टोळीच्या त्रासाला कंटाळून जोगेश्वरीत एका २८ वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. या अभिनेत्रीकडे आरोपींनी २० लाखांची खंडणी मागितल्याचे समोर आल्यानंतर अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदवूून दोन जणांना अटक केली आहे.

जोगेश्वरी पश्चिम येथील कॅप्टन सामंत मार्गावरील हिल पार्क जवळ राहणाऱ्या सलमा ऊर्फ संजना ऊर्फ झारा खातून या तरूणीने गुरूवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने भोजपूरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याप्रकरणी तपासात गंभीर प्रकार उघड झाला आहे. ही तरूणी तिच्या तीन मित्रांसह कलिना येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेली होती.

त्यावेळी आरोपी हे त्या ठिकाणी NCB अधिकारी असल्याचे सांगत पार्टीत आले आणि अटकेची भिती दाखवत होते. कारवाई न करण्यासाठी आरोपींनी ४० लाखांची मागणी केली. तडजोडी अंती कारवाई न करण्यासाठी २० लाखांना हा व्यवहार ठरला. विशेष म्हणजे भोजपुरी अभिनेत्रीसोबत पार्टीत सहभागी असलेल्या आरीफ गाझी याने हा सर्व कट रचला होता.

बदनामी आणि कारवाईच्या भितीने भोजपुरी अभिनेत्री मानसिक तणावाखाली होती. यातूनच तिने जोगेश्वरी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत समोर आले. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी भा.द.वि कलम ३०६, १७०, ४२०, ३४४, ३८८, ३८९, ५०६, १२०(ब) अंतर्गत तोतया NCB अधिकार्यांवर गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी पोलिसांनी सूरज मोहन परदेशी, आशीर काझी, नोफेल रोहे व सूरजचा साथीदार प्रवीण वालिंबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अंबोली पोलिसांनी सूरज व प्रवीणला अटक केली आहे. हे आरोपी ठाण्यातील आसनगाव येथील रहिवासी असून त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *