Uncategorized

आज दक्षिण काशी उत्तरेतील काशीकडे पाहून थोडी हळहळली असेल !

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे काशी कॅरिडॉरचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला.हा सोहळा पहात असताना दक्षिण काशी समजल्या जात असणाऱ्या आपल्या पंढरपूर बाबतही अनेक अपेक्षा मनातून उसळी घेऊ लागल्या,अनेक आश्वासने पुन्हा पुन्हा आठवू लागली आणि अनेक चांगली सकारात्मक कामांबद्दल थोडेफार समाधान वाटले पण एक खंत मात्र नक्कीच आहे.अजूनही खूप बकाल आणि अविकसित आहे आपले पंढरपूर.
या दक्षिण काशीला म्हणजेच आपल्या पंढरपूरला जोडणारे महत्वपूर्ण रस्ते,पालखी महामार्ग आदरणीय ना.नितीन गडकरी यांच्या गाणगापूरात आणि पुण्यात केलेल्या चार वर्षांपूर्वीच्या घोषणेनंतर चकचकीत झाले.चौपदरीकरण झाले,कॉक्रीटचे झाले.तर आता आमदार प्रशांत परिचारक यांच्या पाठपुराव्यामुळे वाखरी ते विठ्ठल मंदीर हा रस्ता कॉक्रीटीकरण होणार आहे.त्यामुळे केंद्र सरकार बद्दल फारशी नाराजी व्यक्त करायला मर्यादा येतात.कारण फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग मंजूर होऊनही अजून प्रलंबित आहे.केंद्राच्या पर्यटन सूचित अजूनही पंढरपूरचा समावेश नाही.
आता राज्य सरकारच्या बाबतीत बोलायचे झाले तर २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारकिर्दीत ५८ कोटी रुपये या शहरातील रस्त्यांसाठी मिळाले.त्यातून अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक हा भंगार छाप रस्ता सोडला तर बाकी रस्ते बऱ्यापैकी समाधानकारक झाले.
२०१६ ला महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपूर साठी नमामि चंद्रभागे योजनेचा शुभारंभ झाला.यातून तुळशी वृदांवन साकारले.नामसंकीर्तन सभागृहास निधी उपलब्ध केला गेला.याच सरकारच्या काळात चंद्रभागेच्या तीरावरील घाट जोडणीसाठी मंजुरी मिळाली.काम सुरु झाले आणि सध्या अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे.राज्यात सत्तेत असलेल्या कुणाला ना खंत आहे ना खेद.
२०१८ वर्षाअखेरीस शिवसेना पक्ष प्रमुख विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिले मंदिर फिर सरकार चा नारा देत पहिला मेळावा पंढरपुरात घेतला होता.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इस्कॉन घाटावरून चंद्रभागेच्या महाआरती करण्यात आली.(यामुळे इस्कॉन घाटाचे महत्व वाढले,प्रति चौरस फुटाच्या पायरी गणिक १० हजार देणगीची त्यांची अपेक्षा आणखी फळाला आली असेल).
याच काळात तत्कालीन मंत्री रामदास कदम यांनी उद्धव घाट परिसराच्या सुशोभीकरणासाठी २ कोटी मंजूर केले.पुढे काय झाले माहित नाही.आषाढी यात्रेपूर्वी शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी पंढपूरला शेगाव प्रमाणे आनंद सागर साकारण्याचे स्वप्न दाखवले.पण गेल्या ५ महिन्यात या बद्दल कोणी चकार शब्द काढत नाही.आपले नगर पालिकेचे अतिकर्तव्यदक्ष मुख्याधिकारी या बाबत सविस्तर माहिती देत नाहीत.आणि त्यांना फारसे प्रश्न विचारलेले आवडतही नाही,लोकसेवक असले तरी. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे काशी कॅरिडॉरचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला असाच एक भव्य सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पंढरपुरात पार पडावा,घाट जोडणीच्या,पूर्णत्वास आलेल्या नमामि चंद्रभागा योजनेच्या कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न व्हावा.हीच अपेक्षा.
केंद्र सरकारकडून आणखीही खूप अपेक्षा आहेत पण आपल्याला महाभाग्य म्हणून जे खासदार भेटले आहेत त्यांच्या ”सामाजिक जाणिवेच्या” आणि ”विविध प्रश्नाच्या” अभ्यासाची अथांग खोली पाहता त्यांच्याकडून जयसिद्धेश्वर स्वामींकडून फारशा अपेक्षा नाहीत.मात्र या पाठपुराव्यासाठी आ.प्रशांत परिचारक हे नक्कीच सक्षम आहेत.
   तर राज्य सरकारकडून पंढरपूरकरांच्या असलेल्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी आपल्याकडील राष्ट्रवादी कॉग्रेस(सर्व गट),शिवसेना आणि कॉग्रेसचेही पदाधिकारी आहेतच.(कारण सामान्य जनतेच्या दृष्टीने या मतदार संघातील लाखभर मतांचे धनी असलेले भगीरथ भालके हे अज्ञात वासात आहेत) 
त्या काशीत उदघाटनांतर आज पंतप्रधानांनी गंगेची महाआरती केली.लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दक्षिण काशी पंढरपुरात असाच भव्य दिव्य लोकार्पण सोहळा घेतील हीच अपेक्षा करूयात.
– राजकुमार शहापूरकर
(संपादक -पंढरी वार्ता )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *