ताज्याघडामोडी

ओमिक्रॉनवर कोव्हिशील्ड लसीचा प्रभाव किती ?

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत असल्याने जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळेच कोविडवरील उपलब्ध लसपैकी कोणती लस सर्वात प्रभावी ठरू शकते, याची चाचपणी सुरू झाली असून सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या काही आठवड्यांत सर्वांसाठीच आनंदाची बातमी देण्याचे संकेत पूनावाला यांनी दिले आहेत.

ओमिक्रॉनचा प्रतिकार करण्यात कोव्हिशील्ड लस किती प्रभावकारी ठरू शकते, हे येत्या दोन ते तीन आठवड्यात स्पष्ट होईल. ओमिक्रॉन अधिक घातक आहे की नाही, हे आताच सांगता येणार नाही. त्यात बूस्टर डोस हा आपल्यापुढे पर्याय आहे. असं असलं तरी सरकारचा पहिला फोकस हा सर्वांना कोविडवरील लसचे दोन्ही डोस देण्यावर आणि लसीकरण पूर्ण करण्यावरच असला पाहिजे, असे पूनावाला यांनी सांगितले.

कोव्हिशील्ड किती प्रमाणात ओमिक्रॉनचा प्रतिकार करू शकते याचा अभ्यास सुरू आहे. त्यामुळे आम्हाला काही आठवडे प्रतीक्षा करावी लागेल. ऑक्सफोर्डचे शास्त्रज्ञ याबाबत संशोधन करत आहेत. ते निष्कार्षापर्यंत पोहचल्यावर आम्ही नवीन लसची निर्मिती करू शकतो. येणाऱ्या सहा महिन्यांत ही लस बूस्टर डोससाठी उपलब्ध करता येऊ शकते, असे पूनावाला यांनी नमूद केले.

काळानुरूप कोव्हिशील्डची प्रतिकारक क्षमता कमी होईल, असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बूस्टर डोस देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला तर लसचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्यास आम्ही तयार आहोत. तज्ज्ञांच्या सल्ल्याने हा डोस दिला जाऊ शकतो. ही लस ६०० रुपयांपर्यंत मिळू शकते, असेही पूनावाला यांनी सांगितले.

लसचा मोठा साठा कंपनीकडे उपलब्ध आहे. राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी आम्ही २५ कोटी डोस राखीव ठेवले आहेत. अशावेळी सरकारने बूस्टर डोस देण्याची घोषणा केल्यास आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे नमूद करताना कोव्होव्हॅक्सबाबत महत्त्वाचे अपडेट्स पूनावाला यांनी दिले. कोव्होव्हॅक्स या लसचा भरपूर साठा आमच्याकडे आहे.

कोविडवरील ही स्वदेशी लस आहे. पुढील काही आठवड्यांत या लसच्या वापराला परवानगी मिळणार आहे. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत ही लस भारतात उपलब्ध होईल, असे पूनावाला म्हणाले. कोव्हिशील्डच्या किमतीत कोणताही बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पूनावाला एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *