ताज्याघडामोडी

‘कामावर रुजू व्हा, अन्यथा…’; परिवहन मंत्री परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देत पगारवाढीचा निर्णय घेणारे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीच्या घोषणेनंतर सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे. जे कर्मचारी निलंबित झाले आहेत, ते कामावर हजर झाल्यानंतर त्यांचे निलंबन रद्द करण्यात येईल, असे परब यांनी जाहीर केले आहे. मात्र, ही घोषणा करतानाच त्यांनी कामावर येऊ न इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक शब्दात इशाराही दिला आहे.

संपावर तोडगा काढत पगारवाढीची घोषणा करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी उद्या गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून कामावर हजर राहावे, असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले. जे कर्मचारी मुंबईत आंदोलनासाठी आले आहेत, त्यांना उद्याऐवजी परवा कामावर हजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी परवा शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत कामावर हजर व्हावे असे परब यांनी म्हटले आहे.

मात्र, हे आवाहन करताना परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना इशाराही दिला आहे. निलंबित झालेले कर्मचारी कामावर हजर झालेच नाहीत, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करेल, असे परब यांनी म्हटले आहे.

तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असे आश्वासनही परब यांनी दिले आहे.

विलिनीकरणाबाबतचा निर्णय समितीच्या अहवालानंतरच

दरम्यान, विलिनीकरणाचा निर्णय आता राज्य सरकार घेणार नसून तो निर्णय हायकोर्टाने नियुक्त केलेस्या त्रिसदस्यीय समितीला घ्यायचा आहे.ही समिती जो काही निर्णय घेईल तो निर्णय राज्य शासन स्वीकारेल, असे परिवहन मंत्री परब यांनी स्पष्ट केले आहे. आता हे राज्य शासनाच्या हातात राहिले नसल्याने कर्मचाऱ्यांनी याचा विचार करून संप मागे घ्यावा आणि कामावर यावे, असे आवाहन परब यांनी पुन्हा एकदा केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *