ताज्याघडामोडी

न.प.मुख्याधिकारी गोत्यात

   

इस्टिमेट फुगवून टेंडर काढणे,टेंडर प्रक्रीयेत विशिष्ट व्यक्तीचाच फायदा व्हावा यासाठी दक्षता घेणे,बोगस बिले काढणे,सलग कामाचं तुकडे पाडून टेंडर काढणे असे अनेक हातखंडे वापरत राज्यात काही नगर पालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याच्या तक्रारी अगदी जिल्हाधिकारी यांच्यापासून ते थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जागरूक नागिरक करत असल्याचे दिसून येते.प्रशासकीय पातळीवर अशा तक्रारींची दखल घेतली जाणे हे तक्रारकर्त्याच्या परम भाग्याचे लक्षण मानले जाते तर राजकीय पातळीवर नगर पालिका असो अथवा नगर पंचायत सत्ताधारी वर्गाकडून अशा तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते.मात्र काहीजण धाडसाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल करतात आणि अशावेळी भ्रष्ट अधिकारी अलगदपणे कारवाईच्या जाळ्यात अडकतो आणि अब्रूचे धिंडवडे निघतात.माळशिरस नगर पंचायतीचे मुख्याधिकारी  डॉ. विश्वनाथ दिगंबरराव वडजे हे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकल्यामुळे पुन्हा एकदा नगर पालिका आणि नगर पंचायती यांच्यामधील भ्रष्र्टाचारा विरोधात लढण्यासाठी सामान्य जागरूक नागिरकांना बळ मिळणार आहे.

 

माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ दिगंबरराव वडजे यांच्या विरोधात एक लाख 26 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने माळशिरस तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून वडजे यांच्या कार्यकाळात झालेल्या इतर विकास कामाचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे.   

माळशिरस येथील माऊली चौक ते कचरेवाडी हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामाच्या बिलाचा चेक तिरूपती कंट्रक्शन यांच्या खात्यावर जमा करण्याच्या मोबदल्यात बिलाच्या तीन टक्के रक्कम तक्रारदारास मागण्यात आली होती.  तक्रारदारांनी याबाबत 30 सप्टेंबर रोजी सांगली‌ येथील अँटी करप्शन ब्युरो कडे तक्रार दाखल केली.   
     तक्रारीनुसार 30 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर रोजी ब्युरोच्या कार्य प्रणाली प्रमाणे पडताळणी केली असता, कारवाईमध्ये CO वडजेंकडे चेक जमा करण्याच्या बदल्यात 1 लाख रुपये व नवीन काम मिळवून देण्यासाठी 26 हजार असे एकूण 1 लाख 26 हजार रुपयाची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर रोजी वडजे यांच्या विरुद्ध सापळा रचून कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *