ताज्याघडामोडी

रेल्वे तिकीटदर ३० टक्क्यांनी कमी करण्याची रेल्वे मंत्रालयाची घोषणा

रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी रेल्वे संदर्भात मोठा निर्णय घेत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी दिली आहे. आता कोरोना पूर्वीप्रमाणेच सर्व रेल्वे गाड्या धावतील. म्हणजेच आता गाड्या जुन्या क्रमांकावरून आणि जुन्या तिकीटदरावर धावतील.

आता मंत्रालयाने विशेष क्रमांकावरून धावणाऱ्या ट्रेनला नियमित रेल्वे क्रमांकावर धावण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांना या आदेशानंतर रेल्वे भाड्यात दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात सुरू झालेल्या गाड्यांच्या विशेष दर्जामुळे प्रवाशांना जास्त भाडे मोजावे लागत होते.\

शुक्रवारी रेल्वे बोर्डाने १२ नोव्हेंबरला जारी केलेल्या परिपत्रकानुसार, रेल्वे नियमित क्रमांकासह आणि प्रवासाच्या संबंधित वर्ग आणि ट्रेनच्या प्रकारासाठी लागू असलेल्या भाड्यांसह पूर्ववत चालवल्या जातील. सध्याचे भाडे या निर्णयामुळे ३० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीचा उद्रेक होण्यापूर्वी, १७०० रेल्वे गाड्या मेल किंवा एक्सप्रेस गाड्या म्हणून चालवण्यात येत होत्या, त्या लॉकडाऊन दरम्यान थांबवण्यात आल्या होत्या.

सर्व हळूहळू अनलॉक होत असताना रेल्वे मंत्रालयाने काही मर्यादित रेल्वे पुन्हा सुरू केल्या आणि त्यांना विशेषचा दर्जा दिला होता. ही रेल्वेसेवा सुरू करताना ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यात आली होती. दरम्यान, नवीन नियम लागू करण्यास दोन-तीन दिवसांचा कालावधील लागू शकतो.

रेल्वेशी संबंधित सर्व सॉफ्टवेअरमध्ये नवीन अपडेट टाकण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे केंद्रीय रेल्वे माहिती कार्यालयाने सांगितले आहे. तसेच आधीपासून बूक करून ठेवलेल्या तिकीटांना नवीन नियमातील तिकीटदर लागू होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *