ताज्याघडामोडी

व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा इशारा

सध्या जो खेळ सुरू आहे, तो काही मेरा नाम जोकर किंवा संगम या दोन चित्रपटांचे इंटरव्हल नाहीत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही, तोपर्यंत पिक्चर संपणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणाचा आणखी भांडाफोड केला. हे काही मेरा नाम जोकर आणि संगम या दोन इंटरव्हलचे पिक्चर नाहीयेत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही तोपर्यंत पिक्चर संपणार नाही. ललित हॉटेल सात महिने बुक होती. तिथूनच प्रायव्हेट आर्मी तिथून काम करत होती.

विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा अनेक लोक येत होते. तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरू होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. वानखेडेच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असं मलिक म्हणाले.

वानखेडे नंतर रडणार

मोहित कंबोज हा आर्यन खान किडनॅपिंगचा मास्टर माइंड आहे. त्यात सॅम डिसूझाचाही सहभाग आहे. आज ना उद्या ते आतमध्येा जाणारच असंही त्यांनी सांगितलं. माझे आरोप खोटे असल्याचं सांगत समीर वानखेडे आता हसत आहेत. पण नंतर ते रडणार आहेत. सत्यमेव जयते होणारच आहे, असा दावाही त्यांनी केला.

चांडाळ चौकडीचा खेळ

एनसीबीच्या कार्यालयात एक चांडाळ चौकडी आहे. हीच चांडाळ चौकडी सर्व खेळ करत आहे. समीर वानखडे, व्हीव्ही सिंग, आशिष रंजन आणि माने नावाचा ड्रायव्हर यांची चांडाळ चौकडी या प्रकरणात कार्यरत होती. असं सांगतानाच गेल्यावेळी माझ्याकडून एक चुकीची माहिती दिली गेली. व्ही. व्ही. सिंग यांनी माझ्या जावयाकडून रेंज रोव्हर मागितली नव्हती. तर आशिष रंजनने रेंज रोव्हर मागितली होती, असं मलिक म्हणाले.

शाहरुखला घाबरवण्याचा प्रयत्न

आर्यन खानला अटक केल्यानंतर मी एनसीबीची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एनसीबीकडून शाहरुख खानला घाबरवण्याचं काम केलं गेलं. नवाब मलिकने बोलायचं थांबवलं नाही तर तुझा मुलगा दीर्घकाळासाठी आत जाईल, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं होतं, असा दावा मलिक यांनी केला. पडद्यामागे काय होत आहे हे मला माहीत नाही. वानखेडे कुणाला फोन करत आहे हे मी नंतर मी उघड करेन. महिलांनाही धमकावलं जात आहे, त्याचीही माहिती मी उघड करेन, असं त्यांनी सांगितलं.

मोहित कंबोज यांनी बँकेत मोठा फ्रॉड केला होता. त्यांनी 1100 कोटी रुपयांचा फ्रॉड केला. त्याच्यावर दीड वर्षापूर्वी धाड पडली होती. पण भाजपमध्ये गेल्यावर सर्व काही बंद झालं. या प्रकरणी कारवाई न झाल्यास आम्ही कोर्टात जाऊ, असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *