गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या; धक्कादायक घटना

कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील एका दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आई आणि भाऊ कामाला गेल्यानंतर, घरी कोणी नसताना तरुणाने घरातील लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली आहे. तरुणाच्या आत्महत्येची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

स्वागत सुखदेव पोवार असं आत्महत्या केलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. तो तारदळ येथील एका खाजगी शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत स्वागत पोवार हा आपल्या कुटुंबीयांसोबत तारदाळ परिसरातील कुपवाडे मळा येथे नजीक तेली यांच्याकडे भाडेकरू म्हणून वास्तव्याला होते. घटनेच्या दिवशी स्वागतची आई आणि भाऊ कामाला गेले होते.

यावेळी स्वागत एकटाच घरात होता. घरी कोणी नसल्याचं पाहून तणावात असलेल्या स्वागतने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने आपल्या राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयातील शिक्षक आणि मृत स्वागत यांच्यात वारंवार वाद होतं होता. दोन दिवसांपूर्वी देखील स्वागतचा आपल्या शिक्षकासोबत वाद झाला होता.

शिक्षकासोबत वाद झाल्यानंतर, गेल्या दोन दिवसांपासून स्वागत तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या घटनेची शहापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शहापूर पोलीस आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *