Uncategorized

ना थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोलरकडून चौकशी झाली ना तत्कालीन अर्थमंत्री मुनगुंटीवार यांनी निवेदनाची दखल घेतली !

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तरी क्वालिटी कंट्रोल होण्याची अपेक्षा

पंढरपूर शहरात राज्य सरकारने मंजूर केलेल्या निधीमधून 52 कोटी रूपयांची 8 कामे करण्यात आली . एकूणच शहरातील रस्त्यांची झालेली वाताहात (चाळण) पाहता नव्याने करण्यात येणारे 8 रस्ते हे उच्च प्रतिचे, दीर्घकाळ टिकणारे असावेत, यासाठी या रस्त्यांचे थर्ड इन्स्पेक्शन हे गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेज ऑफ पुणे अथवा मुंबई या शासनमान्य संस्थेकडे देण्याची मागणी भाजपाचे तत्कालीन सरचिणीस स्व.  संजय वाईकर यांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शुक्रवारी पुणे येथे विधानभवनमध्ये भेटून लेखी निवेदनाद्वारे केली होती.
राज्य सरकार पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रूपये देत आहे. मात्र या कामांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने अधिकारी व ठेकेदार संगनमत करून सदरची कामे निकृष्ठ प्रतिची करत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.  पंढरपूर शहरातील रस्त्यांची वाताहात (चाळण) झाली आहे. दुचाकी महिला, पुरूष वाहनधारकाला तसेच सायकल चालकाला आपले वाहन चालविताना खड्डे चुकवत चुकवत वाहन चालवावे लागत आहे. शहरातील बहुतांश रस्ते हे  खराब झालेले आहेत.राज्य सरकारने पंढरपूरच्या विकासासाठी 52 कोटी रूपयांचे आठ रस्ते मंजूर केले आहेत. या रस्त्यांचा निधी शासनाने जिल्हाधिकार्यांमार्फत पालिकेकडे वर्ग केला आहे.मात्र ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असून  ठेकेदार  पालिकेतील अधिकार्यांना हाताशी धरून आपली बिले अ‍ॅडव्हान्स रूपाने काढून घेत आहेत . याकडे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा व सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे. सदरच्या कामाचा दर्जा हा उत्तम प्रतिचा रहावा, ही कामे दीर्घकाळ टिकावीत, याकरीता या कामाचे थर्ड इन्स्पेक्शन हे गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेज ऑफ पुणे अथवा मुंबई या शासनमान्य संस्थेकडे दिले जावे, अशा आशयाची मागणी राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे  भाजपाचे तत्कालीन सरचिटणीस स्व.संजय वाईकर,चिटणीस शंतनु दंडवते, हर्षद गायकवाड यांनी केली होती. मात्र राज्यात भाजपची सत्ता असताना भाजपच्याच पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीस केराची टोपली दाखविण्यात आली होती.याच काळात करण्यात आलेले पंढरपूर अर्बन बँक ते अंबाबाई पटांगण या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व काँक्रिटीकरणाचे काम तर अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून अर्बन बँक चौकापासून या रस्त्यास पडलेले तडे आता मौलाना आझाद चौकाकडे पोहोचत आहेत.तर जागोजागी वरखाली आलेले चेंबर,रस्त्याची लेव्हल काढता काम उरकल्याने जागोजागी साचून रहाणारे पाणी यामुळे या मोठी नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून आले.नुकतेच या ठिकाणी चेंबर लेवल करून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न झाला.या कामाच्या ठेकेदाराने ठेवलेल्या अनामत रकमेतून दुरुस्ती करण्यात आली अशीही चर्चा झाली पण हेही काम तकलादू स्वरूपाचेच करण्यात आल्याचे निदर्शनास येते.           

विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्ये संपुष्ठात येत आहे.तर भाजपचे वर्चस्व असलेल्या पंढरपुर नगर पालिकेच्या निवडणुकाही डिसेंबर अखेर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूरच्या विकासाचे व्हिजन असलेले नेते म्हणून ओळखले जातात.पंढरपूर शहराच्या पुढील तीस-चाळीस वर्षाच्या गरजा ओळखून ते विकास कामाचे नियोजन करतात अशी त्यांची प्रतिमा आहे.आ.परिचारक यांच्या दूरदृष्टीतून शहरात अनेक उल्लेखनीय विकास कामे नगर पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आली.या विकास कामाची सुरवात होताना आपल्या पंढरपूरचा कायापालट होतोय हे पाहून सामान्य नागिरकांनी समाधानही व्यक्त केले जात असल्याचे पाहावयास मिळते. मात्र याच वेळी अनेक विकास कामे प्रत्यक्षात पूर्ण होत असताना अनेक  कामांचा दर्जा पाहून मात्र सामान्य व सजग नागिरक नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून आले.आणि याचीच परिणीती म्हणजे पंढरपूर नगर पालिकेत भाजपची सत्ता असताना भाजपचेच पदाधिकारी राहिलेल्याकडून भाजपच्याच सत्ता काळात देण्यात आलेले निवेदन होय.  

आता नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात सुमारे १२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेली प्रदक्षिणा मार्गासह विविध रस्त्याची खडीकरण व डांबरीकरणाची कामे हाती घेतली जात आहेत.मंजुरीत अडथळा येऊ नये म्हणून सुमारे २ किलोमीटर लांबीच्या प्रदक्षिणा मार्गाच्या डांबरीकरणच्या कामाचे ५ तुकडे पाडण्यात आले अशीही चर्चा होताना दिसून येत आहे.इतर ९ कोटीच्या कामात केवळ सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांच्या प्रभागातील कामानाच प्राधान्य दिले गेले आहे असाही आरोप विरोधकांकडून होत आहे.मात्र रस्तयांची कामे होणार आहेत हे लक्षात घेऊन सामान्य नागरिक खुश असले तरी हे कामे तरी दर्जेदार व्हावीत अशी अपेक्षा मात्र व्यक्त होताना दिसून येत आहे.             

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *