ताज्याघडामोडी

अतिक्रम काढण्यासाठी बंदोबस्तावर गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रम काढण्यासाठी गेलेल्या पथकासोबत बंदोबस्ताला गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केल्याची घटना जामनेर तालुक्यातील लोणी येथे घडली.

या घटनेत पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनाही मुका मार लागला आहे. दरम्यान, याप्रकरणी सहा जणांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

जामनेर तालुक्यातील लोणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत ग्रामपंचायतस्तरावर रीतसर तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून बंदोबस्त मागवण्यात आला होता. त्यानुसार पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, उपनिरीक्षक एस.पी. बनसोड, किरण शिंपी, विद्या छाडेकर, दिनेश मारवळकर, अनिल सुरवाडे आदी कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्ताला गेले होते. यावेळी अतिक्रमणधारकांनी कारवाईस विरोध केला. अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटवण्याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

सहा जणांवर गुन्हा; दोघांना अटक

पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी दत्तू कडू उगले, ज्ञानेश्वर कडू उगले, सागर केशव उगले, महादू कडू उगले, भास्कर वाघ व पवन महादू उगले यांच्याविरोधात पहूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दत्तू उगले व ज्ञानेश्वर उगले या दोघा भावांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *