ताज्याघडामोडी

मतदानाचा हक्क बजावण्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये – मुख्य निवडणूक अधिकारी

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र युवक-युवतींनी मतदार म्हणून आपली नोंद मतदार यादीत करून घ्यावी. मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पियुष सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मतदार नोंदणी ही निरंतन चालणारी प्रक्रिया असून या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2022 या दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. यात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे असे सांगत देशपांडे पुढे म्हणाले की, पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी ज्यांना वयाचे अठरा वर्षे पूर्ण होत आहेत अशा पात्र युवक-युवतींनी मतदार म्हणून आपली नोंद मतदार यादीत करुन घ्यावी.

या कार्यक्रमांतर्गत पात्र असूनही ज्या नागरीकांचे नाव मतदार यादीत नाहीत, त्यांना सुद्धा आपली नावे मतदार यादीत नोंदविता येतील. जे मतदार स्थानांतरीत झाले आहेत तसेच मरण पावलेल्या मतदारांच्या संदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना देऊन आपल्या नावाचे स्थानांतरण किंवा वगळणी करीता सहकार्य करावे. ज्या मतदारांचे अजूनही मतदार यादीत छायाचित्र नाहीत त्यांनी आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदान नोंदणी अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयात जमा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 13, 14, 27 आणि 28 नोव्हेंबर 2021 या दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम आयोजित करण्यात येत आहे. प्रत्येक नागरीकाने मतदानाचे कर्तव्य बजावता यावे यासाठी सहकार्य करावे. उपरोक्त दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर हजर राहून पात्र व्यक्तींचे मतदान नोंदणीसाठी अर्ज स्विकारतील, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमधील नावातील दुरुस्त्या, बदल, तृतीय पंथीयांसाठी लिंग बदलाबाबतची सुविधा, छायाचित्रे अद्ययावत करणे, गरजेनुसार नवीन मतदान केंद्र तयार करणे आदींचा समावेश करण्यात येत आहे. मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करुन अद्ययावत मतदार यादी तयार करण्यात येत आहे. जर यावर कुणाला आक्षेप असल्यास त्याची शहानिशा करुन दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. तसेच याबाबत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यभर दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष ग्रामसभा बोलविण्यात येणार आहे. या ग्रामसभेमध्ये त्या-त्या गावात उपलब्ध असलेल्या मतदार याद्यांचे वाचन करुन सुटलेली नावे यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग, नवीन लग्न झालेल्या तसेच लग्न होवून परगावी गेलेल्या महिलांची नावे अद्ययावत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देहविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांची मदत घेतली जाईल, असेही देशपांडे यावेळी म्हणाले.

अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गट, आशा वर्कर यांच्या माध्यमातून संपूर्ण शहरात मतदान नोंदणी व मतदार जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येतील. तसेच महानगरपालिका झोन कार्यालय येथे मतदार नोंदणी केंद्र सुरु करण्यात येत असल्याची माहिती फुलझेले यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *