ताज्याघडामोडी

बोअर खोदताना जमिनीतून पाण्याऐवजी निघाल्या आगीच्या ज्वाला; मशीन जळून खाक

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात एका शाळेत बोअर मशीनने पाणी काढण्यासाठी खोदकाम सुरू असताना पाण्याऐवजी चक्क आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्याने खळबळ उडाली. शाळेत मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी बोअर खोदण्याचं काम सुरू होतं. शासकीय निधीतून शाळेसाठी बोअर पाडण्यात येत होती. त्याचवेळेला घडलेल्या प्रकाराने उपस्थितांना मोठा धक्का बसला. ५० फूट खोदकाम केल्यानंतर जमिनीतून पाण्याऐवजी आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. काहीही कळण्याच्या आधीच आगीने भयानक रुप घेत बोअर मशिनला विळख्यात घेतलं. त्यात बोअर मशिनला लागलेल्या आगीत मशिनचं नुकसान झालं.

ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर आसपासचे लोक बघण्यासाठी घटनास्थळी आले. तिथे लोकांची गर्दी झाली. स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती गुनौर पोलीस आणि प्रशासनाला दिली. तेव्हा तात्काळ अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. फायर ब्रिगेडने बोअर मशिनला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आणखीच वाढत होती. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या गाड्यांना यश आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *