Uncategorized

वनविभागामुळे रखडलेल्या रस्त्यांचा प्रश्न लागणार मार्गी

पंढरपूर-वनविभागाने हरकत घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे रखडली असून याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी केंद्रीय रस्ते मंत्री मा.नितीन गडकरी यांना भेटून याबाबत सविस्तर माहिती सादर केली. या प्रश्‍नावर मा.नितीन गडकरी यांनी लवकरच निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यात विविध राष्ट्रीय महामार्गाची कामे वेगाने सुरू आहेत. परंतु यापैकी काही रस्ते हे वनविभागाच्या हद्दीतून जातात. वनविभागाच्या जाचक अटींमुळे अशा रस्त्यांचा ताबा मिळत नाही. यामुळे अनेक रस्त्यांची कामे रखडली आहे. पंढरपूर ते सांगोला या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीतील वनविभागाने हरकत घेतल्यामुळे मागील तीन वर्षा पासून येथील दोन किमी. रस्त्याचे काम रखडले आहे. याचा मोठा फटका या रस्त्यावरून दैनंदिन ये-जा करणार्‍यांना होत आहे. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, मालवाहतूक करणारे यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच कोल्हापूर, कर्नाटक भागातून येणार्‍या भाविकांना याचा त्रास सहन करावा लागतो. सध्या येथे मोठे खड्डे पडले असून यामुळे वारंवार अपघात होत आहेत. सदर सांगोला-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील वनविभागाच्या हद्दीतील काम तातडीने पूर्ण करावे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या हद्दीतून जाणारे रस्ते आहे त्या स्थितीत वन विभागाची कोणतीही जमीन न घेता पूर्ण करावेत अशी विनंती आमदार प्रशांत परिचारक यांनी मा.नितीन गडकरी यांना केली. दरम्यान याबाबत मा.गडकरी यांनी सविस्तर माहिती घेत लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *