तक्रारदार व्यक्ती,त्याची पत्नी आणि मुलगा यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदाराच्या पत्नीस अटक न करण्यासाठी १० हजार लाचेची मागणी करून त्यापैकी ७ हजार रुपये स्वीकारल्याने पुणे लाचलुचपत विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे व लाचलुचपत विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई करत शशिकांत तुकाराम वलेकर पोलीस नाईक करमाळा पोलीस ठाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईमुळे करमाळा तालुक्यात मोठी चर्चा होत असून गेल्या काही महिन्यात राज्यात लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत अनेक पोलीस अधीकारी व कर्मचारीच जाळ्यात अडकत असल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.एकीकडे कोरोना काळात कर्तव्यनिष्ठ पोलीस अधीकारी व कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत होते त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये महाराष्ट्र पोलिसांबद्दल सामान्य जनतेमध्ये अतिशय आदराची भावना निर्माण झालेली असताना पोलीस खात्यातील काही कु प्रवृत्तीमूळे पोलीस खात्यास बदनामी सहन करावी लागत आहे.अशा घटना टाळण्यासाठी पोलीस खात्यातील कर्तव्यकठोर अधिकारी आणि कर्मचारी यांनीच आता आपल्या खात्यातील अशा कूप्रवृत्ती विरोधात ठोस उपायोजना करणे गरजेचे झाले आहे.