ताज्याघडामोडी

शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द, 1 ऑक्टोंबरपासून शिवभोजन थाळी पूर्वीप्रमाणे 10 रूपयाला

राज्यात कोरोनाचे आकडे कमी होत असताना आता राज्यात सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना 15 एप्रिल पासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी अंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती.

मात्र आता राज्यातील कोरोनाची परिस्थिती अटोक्यात आल्याने राज्य सरकारने शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय रद्द केला आहे. 1 ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळी पुन्हा 10 रुपयांना मिळणार आहे.

कोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत होते. कोरोनामुळे लाभार्थ्यांना ही थाळी मोफत दिली जात होती. 30 सप्टेंबरपर्यंत थाळी मोफत असेल नंतर त्याचे दर 10 रुपये असे पूर्वीप्रमाणे करण्याचा शासनादेश आज जारी करण्यात आला आहे. तसेच पार्सल सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक द चेन प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली होती.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविली जात आहे. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत याची काळजी शासनाने घेतली आहे. राज्यात दिनांक 15 एप्रिल 2021 पासून शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे.

15 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 पर्यंत 48 लाख 44 हजार 709 नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *