ताज्याघडामोडी

भगीरथ भालकेंचे मौन अन कट्टर समर्थकांची घुसमट

पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात ना कधी पक्ष महत्वाचा ठरला ना कुठल्या पक्षाच्या नेत्याचा आदेश.या तालुक्याच्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकरणात जेव्हा जेव्हा परिचारक गट म्हणजे आताचा पांडुरंग परिवार आणि विठ्ठल कारखान्याशी संबंधित असलेला विठ्ठल परिवार हे आमने सामने आले तेव्हा या दोन्ही गटाच्या कट्टर समर्थकांनी ना आपल्या नेत्याचा पक्ष पाहिला ना राज्यात प्रभावी असलेल्या नेत्याचा पक्ष.

या तालुक्यात जोपासली गेली ती पराकोटीची राजकीय निष्ठा आणि ईर्षा.स्व.माजी आमदार औदूंबरअण्णा पाटील यांनी गुरसाळेच्या माळरानावर विठ्ठलच्या रूपाने या तालुक्यातील कृषी औद्योगिक क्रांतीची मुहूतमेढ रोवली.पण १९८१ इंदिरा लाटेत त्यांचा पराभव झाला आणि या तालुक्यात पक्ष मह्त्वाचा मानून जनतेने मतदान केलेली ती एकमेव निवडणूक असावी असेच मत आजही राजकीय जाणकार व्यक्त करतात.

पुढे १९८५,१९९१,१९९५,१९९९,२००४ या साली झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या निडवणुकीचा लेखा जोखा लक्षात घेतला तर तालुक्यातील पारंपरिक २ राजकीय प्रवाहाची पकड या तालुक्याच्या राजकारणावर किती मजबूत आहे हे दिसून येईल.यातूनच विठ्ठल परिवारास १९८५ पासून आमदारकीचे वेध लागले होते आणि त्यासाठी या परिवारातील कट्टर कार्यकर्ता जणूकाही ईर्षेला पेटला होता.१९९९ मध्ये विठ्ठलचे तत्कालीन चेअरमन स्व.वसंतराव काळे विधानसभेच्या मैदानात स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या विरोधात शिवसेना पुरस्कृत उमेदवारी घेऊन उतरले.याच निवडणुकीत विठ्ठल परिवारातील एक अति बलाढ्य गट परिचारिकांच्या प्रचारात सामील झाला पण निवडणूक मात्र चुरशीची झाली.तर २००४ मध्ये स्वर्गीय राजूबापू पाटील हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले त्यावेळी विठ्ठलचे तत्कालीन चेअरमन स्व.आ.भारत भालके हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले पण पराभूत झाले.

२००९ ला मात्र स्व.आ.भारत भालके यांनी विठ्ठल परिवाराचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण केले.२००७ मध्ये मतदार संघ पुनर्र्चना झाली होती.पंढरपूर आणि तालुक्यातील केवळ २२ गावे या मतदार संघात समाविष्ट होती,या निवडणुकीत विठठल परिवाराशी निगडित कल्याण काळे,स्व.राजूबापू पाटील,विठ्ठलचे विद्यमान संचालक युवराज पाटील हे सारे स्व.आ. भालके यांच्या विरोधात प्रचार करत होते तरीही ते विजयी झाल्यामुळे विठ्ठल परिवारात,तालुक्यातील कट्टर परिचारक विरोधी गटात मोठा उत्साह निर्माण झाला होता.

पुढे २०१४ ची विधानसभा निवडणूक पुन्हा स्व.आ.भालकेंनी जिंकली पण त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अधोगती बाबत फारशी चर्चा नव्हती.२०१६ पासून विट्ठला सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत उघड उघड आरोप होऊ लागले.कारखान्यावर शेकडो कोटीच्या कर्जाचे आरोप होऊ लागले आणि विठ्ठल परिवारात अस्वस्थता निर्माण झाली.अशातच २०१९-२० चा गळीत हंगाम आर्थिक अडचणीमुळे विठ्ठल घेऊ शकला नाही आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्व.आ.भालकेंच्या विरोधात प्रचाराचा हा महत्वाचा मुद्दा होता.मात्र यावेळीही विठ्ठल परिवारातील कट्टर परिचारक विरोधकांनी त्यांची साथ सोडली नाही.

नोव्हेंबर २०२० मध्ये स्व.आ.भालकेंच्या निधनानंतर मात्र परिस्थिती हळूहळू बदलत चालली आहे.भगीरथ भालकेंनी विठ्ठलच्या चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली.विधानसभा निवडणुकीला समोरही गेली.१ लाख ५ हजार इतकी मतेही मिळवली.तीन सव्वातीन हजार मतांनी पराभूत झाले.या नंतर मात्र त्यांनी जणूकाही संपर्कच तोडला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली.

विठ्ठल कारखान्याबाबत अनेक चर्चा होताना दिसून येतात,अनेक वाद प्रवाद,आरोप प्रत्यारोप केले जातात.त्याच बरोबर पंढरपूर शहरातील अनेक कट्टर भालके सर्मथक जनतेच्या विविध प्रश्नासाठी भगीरथ भालकेंनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे अशी खाजगीत प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात ते केवळ भगीरथ भालके हे स्व.आ.भारत भालके यांचा राजकीय वारसा भगीरथ भालके हे आक्रमपणे पुढे चालवतील या अपेक्षेने परंतु विधानसभा पोटनिवडणुकी नंतर भगीरथ भालके हे जे अंतर्धान पावले आहेत ते आजतागायत प्रकट होत नाहीत,आमचा फोन देखील उचलत नाहीत अशी भावना त्यांच्याच गटाचे कट्टर कार्यकर्ते व्यक्त करताना दिसून येतात.मात्र याच वेळी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत आलेले कल्याणराव काळे यांच्या कारखान्याचेही बिले थकली होती,कामगारांचे पगार थकले होते ते मात्र प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात,पक्षाच्या बैठकित बिनधास्तपणे वावरताना दिसून येतात.

मात्र याच वेळी भगीरथ भालके हे विठ्ठलच्या संचालक मंडळाच्या बैठकीस देखील उपस्थित नसतात असा आरोप त्यांच्यावर सातत्याने होतो आहे.पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक तोंडावर आहे.राज्यात सत्ता आपली आहे त्यामुळे भगीरथ भालके हे आपल्या प्रभागातील,वार्डातील प्रश्न वरिष्ठ प्रशासकीय पातळीवरून नगर पालिका प्रशासनावर दबाव आणून सोडवू शकतात अशी त्याच्या समर्थक कार्यकर्त्याची अपेक्षा आहे.पण या बाबतही त्यांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजीच व्यक्त होताना दिसून येते.           

आज डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याच्या ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा एक सभासद या नात्याने पत्रकार परिषद घेऊन अनेक आर्थिक घोट्याळ्याचे गंभीर आरोप केले आहेत.

अभिजित पाटील हे केवळ विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सामान्य सभासद नाहीत तर चार साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.यामुळे त्यांनी केलेल्या आरोपास मोठे महत्व प्राप्त झाले आहे.आता हे आरोप फेटाळून लावण्यासाठी भगीरथ भालके हे देखील पत्रकार परिषद घेतील अशी अपेक्षा त्यांचे काही कट्टर सर्मथक खाजगीत व्यक्त करत आहेत.डीव्हीपी समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राजकीय भूमिका न घेता विठ्ठलचा सभासद या नात्याने आतापर्यत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गैर व्यवस्थापनावर बोट ठेवत आरोप केले आहेत.ते परिचारक गटास विरोध करण्याचे विठ्ठल परिवारास खुश करण्याचे पारंपरिक प्रभावी अस्त्र बाहेर काढत नाहीत तो पर्यत कदाचित ते विट्ठलच्या राजकीय घडामोडीत प्रभावी भूमिका बजावू शकणार नाहीत.

मात्र जेव्हा ते परिचारक गटास विरोध या विठ्ठल परिवार प्रिय अस्त्रासह  राजकीय भूमिका मांडू लागतील तेव्हा मात्र विठ्ठल परिवारात एक नवा नेता म्हणून ते पुढे येऊ शकतात हे मात्र निश्चित.आणि या तालुक्यातील जो नेता तालुक्याच्या राजकारणात परिचारक गटास सक्षमपणे विरोध करू शकतो तोच आपला नेता अशी धारणा असलेला वर्ग अजूनही विठ्ठल परिवारात मोठा आहे.   

– राजकुमार शहापूरकर       

नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार ”विठ्ठल’ ची ३० सप्टेंबर रोजी प्रस्तावित असलेली ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *