पत्नी घरी परत येत नसल्याने संतापलेल्या पतीने सासूवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्नीलाही जखमी केले. ही धक्कादायक घटना पारडी परिसरात घडली. जखमी सासूवर मेयोत उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.राजेंद्र साहू (२८, डिप्टी सिग्नल, दुर्गा माता चौक) असे आरोपीचे नाव आहे आणि दुलेश्वरी (वय २८) असे पत्नीचे नाव आहे. तर जानकी साहू (वय ४५, रा. शितळा माता मंदिर, पारडी) असे जखमी सासूचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात राजेंद्रचा दुलेश्वरी हिच्याशी विवाह झाला होता. दुलेश्वरीचा पहिला विवाह २०१७ मध्ये झाला होता. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने तिच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला. यानंतर तिने राजेंद्रसोबत दुसरे लग्न केले. राजेंद्रला दारूचे व्यसन होते आणि त्यामुळे दुलेश्वरी त्याचा व्यासनामुळे त्रस्त होती. सततच्या त्रासाला कंटाळून दुलेश्वरी माहेरी आली आणि आई-वडिलांसोबत राहू लागली. तेथे राजेंद्र दुलेश्वरीला परत आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न करत होता. त्याने अनेकवेळा सासू-सासऱ्यांची विनवणीही केली. मात्र काहीच होत नसल्याने तो संतापला होता.
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास राजेंद्र दारूच्या नशेत सासरी गेला आणि दुलेश्वरीला परत घरी येण्याची विनंती करू लागला. मात्र, दुलेश्वरीने स्पष्ट नकार दिला. याचा राग येऊन राजेंद्रने खिशातून चाकू काढून आधी सासूच्या छातीवर आणि हातावर वार केले. यानंतर आईला वाचवण्यासाठी आलेल्या दुनेश्वरीच्या पाठीवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मायलेकी दोघेही गंभीर जखमी झाले. आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले. त्यानंतर शेजाऱ्यांनी जखमी मायलेकींना जवळच्या रुग्णालयात नेले असता तेथून त्यांना मेयो रूग्णालयात पाठवण्यात आले. दुलेश्वरीच्या तक्रारीवरून पारडी पोलिस ठाण्यात राजेंद्र विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.