गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

“हिरेन हत्या’ हादेखील वाझेचाच कट ! ‘एनआयए’च्या आरोपपत्रात अनेक धक्‍कादायक खुलासे

जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन आढळल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने उद्योगपतीकडून पैसे उकळण्यासाठी हा कट रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सादर केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली आहे.

याचसोबत, वाहनाचे मूळ मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा देखील कट वाझेनेच रचला होता, असे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे की, हा कट रचण्यामागे उद्योगपतीला घाबरवण्याचा आणि गंभीर परिणामांची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा स्पष्ट हेतू होता. या कटामध्ये माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह पाच सेवेतील आणि निवृत्त पोलिसांचा कथित सहभाग होता.

अंबानी कुटुंबाला धमकी देण्यासाठी वाझे याने वाहनात एक चिठ्ठी ठेवली होती. तपासकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी टेलीग्राम या ऍपवर एक मेसेज पोस्ट करण्यात आला होता. ज्यामध्ये कथितरित्या जैश-उल-हिंद ही दहशतवादी संघटना स्फोटकं लपवण्याची जबाबदारी घेत असल्याचे भासवण्यात आले होते. त्याचप्रमाणे वाझे यानेच संबंधित वाहनाचे मूळ मालक मनसुख हिरेन यांची हत्या करण्याचा कट रचला होता, असे या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

पुढे हा प्रकार समोर आल्यानंतर सचिन वाझे हाच घटनास्थळी पोहोचणारा पहिला व्यक्ती होता. यावेळी त्याने या संपूर्ण प्रकरणाचा तपास स्वतःकडे हस्तांतरित केला. जेणेकरून अंबानी कुटुंब आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याच्या सुनियोजित षडयंत्राचा भाग म्हणून त्याला या संपूर्ण प्रकरणाची मोडतोड करणे सहज शक्‍य होईल.

त्यातच दुसऱ्या दिवशी जेव्हा वाझे याच्यासोबत गेलेल्या पोलीस वाहन चालकाने ही बातमी पाहिली तेव्हा त्याला धक्काच बसला. परंतु, वाझेने त्यालाही याबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिल्याचे एनआयएने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *